मुंबई – अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केले. मी काम करताना अतुल सावे राजकारणात कधी येतील हे मला वाटलं नव्हते. परंतु ते मागुन आले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले, सगळंच झालं…अरे आमच्याकडेही पहाना जरा…आज काल सिनीयरीटी काही उरली आहे की नाही” असा सवालही शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांनी केला.
औरंगाबादेतील एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली. काही दिवसांपुर्वीही त्यांनी अशाच पद्धतीने शिंदे गटावर आपली जाहीर नाराजी ट्विटच्या माध्यमातून केली होती.
औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट यांनी नाराज असल्याबाबत एक सुचक ट्विट केले होते. त्या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर त्यांच्याशी दिपक केसरकर यांनी चर्चा करुन मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटबद्दल सारवासारव केली. होती. ते म्हणाले होते की, ”मी भावनेच्या भरात बोलून गेलो. पण स्पष्ट सांगतो की, हा सर्व माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्राॅब्लेम आहे. मागची पोस्ट कशी पुन्हा फाॅरवर्ड झाली हे मला आता सांगता येणार नाही” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. यामुळे ते नाराज होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. ‘आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही, तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत,’ हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.