यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
यवतमाळ : गेल्या 8 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी (दि. 25) रात्रीपासून दमदार हजेरी लावली. तब्बल एकाच रात्री 70.3 मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात 62 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने मात्र शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. आता उरलेल्या पेरणीची लगबग वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भर उन्हाळ्यात मे व जून महिन्यामध्ये वीस दिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे कठीण झाले होते. पाऊस बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची सुरुवात केली. त्यानंतर लगेच आणखी पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी मशागत उरकून पेरणीला सुरुवात केली. मात्र, पुन्हा पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. अशात बुधवारी (दि. 25) रात्री एकाएकी पावसाला सुरुवात झाली. एकाच रात्री तब्बल 70.3 मिमी पावसाची नोंद झाली. यात 62 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे, तर अनेक ठिकाणी रस्ते, पुलाचेही नुकसान झाले.
महागाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच जनुना येथील पूल वाहून गेल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दारव्हा तालुक्यातही मध्यरात्री संततधार पावसाला सुरुवात झाली. यासह करंजी, उमरखेड, घाटंजी, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पहिल्याच पावसात 62 ठिकाणी अतिवृष्टी झाली.
यामध्ये यवतमाळ तालुक्यातील येळाबारा, बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, कळंब तालुक्यात जोडमोहा, मेटीखेडा, दारव्हा तालुक्यातील चिकणी, लोही, बोरी, दिग्रस सिंगद, आर्णी तालुक्यातील लोनबेहळ, सावळी, अंजनखेड, नेर तालुक्यातील नेर, मालखेड, पुसद तालुक्यातील पुसद, गौळ खु, शेंबाळपिंपरी याचा समावेश आहे.
घाटंजी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
जिल्ह्यात एकाच रात्री तब्बल 70.03 टक्के पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक 127.9 मिमी पावसाची नोंद घाटंजी तालुक्यात करण्यात आली. यवतमाळ-45.7 मिमी., बाभूळगाव-27.4, कळंब- 39.2, दारव्हा 58.9, दिग्रस-55.1, आर्णी- 90.7, नेर- 54.3. पुसद- 74.8. उमरखेड- 110, महागाव 127.6. वणी- 29. मारेगाव- 57.4, झरी जामणी- 64.5. केळापूर-81. राळेगाव- 66.6 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.
संपूर्ण जिल्ह्यात अधूनमधून पाऊस
संपूर्ण जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडत आहे. 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 140 मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 15 टक्के पाऊस पडला आहे. शिरोली, साखरा, शिवणी, घोटी, पारवा, कुर्ली, राळेगाव तालुक्यातील धानोरा, वाढोणा, वडकी, वरूड, किन्ही येथे 65 मीमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली.