तणावामागे भारताचा हात सांगणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानचे सडेतोड उत्तर (Photo Credit- X)
Afghanistan Pakistan War: इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानचे (तालिबान) संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानसोबतच्या तणावामागे भारताचा हात असल्याच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काबूलला इस्लामाबादसोबत चांगले शेजारी संबंध आणि व्यापारी विस्तार हवा आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एका मुलाखतीत भारताच्या कथित भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अफगाण संरक्षण मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. आमच्या देशाची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देण्याची आमची कधीही नीती राहिलेली नाही.”
संरक्षण मंत्री मौलवी याकूब यांनी स्पष्ट केले की, अफगाणिस्तान भारतासोबत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून संबंध ठेवतो आणि राष्ट्रीय हिताच्या कक्षेत हे संबंध मजबूत करत राहील, तसेच पाकिस्तानसोबतही चांगले शेजारी संबंध राखेल.
संरक्षण मंत्री मुजाहिद यांनी माहिती दिली की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या दोहा कराराच्या प्रगतीवर पुढील बैठक तुर्कीमध्ये होणार आहे. या बैठकीत कराराची अंमलबजावणी आणि त्याच्या देखरेखीच्या यंत्रणेवर चर्चा केली जाईल. त्यांनी सर्व पक्षांना करारातील प्रत्येक तरतुदीचे पालन करण्याचे आवाहन केले. “काबूल कराराच्या सर्व अटींसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. जर पाकिस्तानने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत, तर समस्या निर्माण होतील.”
मौलवी याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराही दिला.