Milind Gawali Shared Special Post For Kedar Shinde
दिग्दर्शक केदार शिंदे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक आहेत. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिनही माध्यमांमध्ये कलाकृतींचे दिग्दर्शन करणं, ही त्यांची ख्याती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांनी ह्या चित्रपटाची दिग्दर्शन केले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झापूक झुपूक’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत, ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
‘लापता लेडीज’ ‘या’ विदेशी चित्रपटाची कॉपी, किरण राववर कथा चोरल्याचा आरोप
अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाले आहेत. तेव्हापासूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. खरंतर दिग्दर्शक केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेवेळी चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे. २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी केदार शिंदे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी केदार शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिलीय की, “केदार शिंदे आणि माझी अनेक वर्ष मैत्री आहे. पहिल्यांदा केदार यांना मी ‘फिल्मसिटी’मध्ये १९९५-९६ला ‘असंच पाहिजे नवंनवं’ या माझ्या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटलो होतो. केदार अंकुश चौधरी यांना भेटायला आले होते, दोघांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यानंतर ‘मराठा बटालियन’साठी निर्माते वासवानी यांना एक उत्कृष्ट लेखक हवा होता. त्यावेळेला मी केदार शिंदे यांना ‘मराठा बटालियन’चे डायलॉग लिहिण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे ‘मराठा बटालियन’ या चित्रपटाचे काही सीन्स केदार यांनी लिहिले आहेत. मग एकदा ‘हसा चकटफू’ या त्यांच्या मालिकेमध्ये मला निवेदकाची भूमिका त्यांनी दिली होती. या सगळ्या गोष्टींना २९-३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सुंदर सिनेमे केले, पण आमचा एकत्र काम करायचा कधी योग आला नाही. अचानक माझी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली आणि केदार त्यांचा जिओ स्टुडिओ बरोबरचा ‘झापुक झूपूक’ या चित्रपटामध्ये ‘पंजाबराव’च्या भूमिकेसाठी मला विचारलं. मी एका क्षणाचा विलंब न करता ‘हो’ म्हणालो. केदारबरोबर काम करायची माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झालीय. अतिशय सुंदर पद्धतीने माझं या चित्रपटामध्ये शूटिंग झालं. आज चित्रपट पूर्ण झाला आहे. २५ एप्रिलला तो रिलीज होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन सुरू झालं आहे, माझ्या आयुष्यातला हा पहिलाच चित्रपट ज्याची रिलीज डेट आधीच ठरली होती. तीन महिन्याच्या आत हा चित्रपट पूर्ण होऊन प्रेक्षकांसमोर येतो आहे. केदार यांचा हात शूटिंग दरम्यान फ्रॅक्चर झाला. तरी सुद्धा शूटिंगला ब्रेक न देता ठरल्याप्रमाणे त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्यांच्या शारीरिक वेदना जाणवत होत्या. पण मी शब्द दिला आहे, मग माझा हात मोडला तरी तो शब्द मी पाळणार. वेदना सहन करत एक सुंदर मराठी एंटरटेनमेंटींग चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत आणि हा चित्रपट खूप चालेल अशी माझी खात्री आहे”, असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.