यावेळी बोलताना चंद्रकांत कळंबे यांनी प्रवीण दरेकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलादपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हा भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झाला असून यापुढेही शिवसेनाच पोलादपूरचा सर्वांगीण विकास करेल असे आश्वासित केले.
प्रवीण दरेकरांच्या टीकेवर पलटवार
चंद्रकांत कळंबे पुढे असंही म्हणाले की, प्रवीण दरेकरांसारखी माणसं निवडणुकांपूर्ती येतात व निवडणुका झाल्या की परत दिसत देखील नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन जाहीर सभेतून चंद्रकांत कळंबे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून आमदार प्रवीण दरेकर यांना कोणीतरी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप देखील यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी केला.
पोलादपूर तालुक्याचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून जोमाने सुरू असून यापुढे शंभर टक्के कामे पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही हाती घेतला आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम करून पक्षाला घवघवीत यश संपादन करून देण्याची जबाबदारी असल्याचे देखील या जाहीर सभेतून मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. जो कार्यकर्ता निवडणुकीत पक्षाचे काम करणार नाही त्याचा निवडणुकीनंतर जय महाराष्ट्र केला जाईल असा इशारा जाहीर सभेतून मंत्री गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
देवळे, तुर्भे खोंडा, चांभारगणी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
देवळे गावचे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंद केसरकर, चांभरगणी ग्रामपंचायतचे सदस्य सतीश गोळे, तुर्भे खोंडा गावच्या ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.






