सौजन्य- सोशल मीडिया
Ek Daav Bhutacha Poster : सर्वांचा लाडका सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव आणि अष्टपैलू अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘दे धक्का’ आणि ‘दे धक्का २’च्या अभूतपूर्व यशानंतर सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दोघेही एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘एक डाव भूताचा’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवाय चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – रणवीर ब्रारचा आता ‘तुफानी बिर्याणी हंट’, डिस्नी+ हॉटस्टारवर येणार धमाकेदार नवा सीझन
सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. नुकतंच सिद्धार्थ जाधवने काही तासांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुखही दिसत आहे. सिद्धार्थ जाधव फ्रेममध्ये असणाऱ्या मकरंद अनासपुरे यांच्याकडे हात करुन उभा आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता कथानकाचा अंदाज बांधता येत नाहीये. त्यामुळे मकरंद, सिद्धार्थच्या आणि मयुरीच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.