फोटो सौजन्य - Social Media
हल्ली कलाकार केवळ अभिनयापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन अनेक क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध करताना दिसतात. कोणी व्यवसायात उतरले, तर कोणी स्वतःच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद साधताना दिसतात. अशाच वेगळ्या पावलाचं उदाहरण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने घातलं आहे. अभिनयाच्या जोडीला ती आता एका नव्या प्रवासाला निघाली असून स्वतःच्या निर्मिती संस्थेतून “तेजक्राफ्ट” या बॅनरखाली स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलवरील पहिली मालिकाच प्रेक्षकांसाठी खास ठरली आहे: “Temple Trails with Tejaswini”.
या मालिकेच्या नावावरूनच प्रेक्षकांना कल्पना येते की यात मंदिरे, परंपरा आणि संस्कृती यांचा आढावा असणार आहे. मात्र ही फक्त धार्मिक स्थळांची सफर नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची एक आध्यात्मिक यात्रा आहे. तेजस्विनी या मालिकेतून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण मंदिरांचा इतिहास, त्यामागची श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.
तेजस्विनी सांगते, “हे फक्त मंदिरे दाखवण्याचं किंवा प्रवास सांगण्याचं माध्यम नाही. हा आपल्या परंपरेच्या मूळाशी जाण्याचा, श्रद्धा आणि इतिहास एकत्र अनुभवण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं, प्रत्येक मंदिराच्या भिंती एक कथा सांगतात आणि ती कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं हेच या मालिकेचं खरं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर धार्मिक स्थळ आहेत आणि त्याचा मागची गोष्ट यातून मला प्रेक्षकांना सांगायची आहे म्हणून ही सीरिज करू या असं ठरवलं”
मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तेजस्विनी, आता या नव्या प्रयोगातून पुन्हा एकदा चाहत्यांसमोर वेगळ्या भूमिकेत दिसते आहे. अभिनयासोबतच ती प्रेक्षकांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यामुळे “Temple Trails with Tejaswini” ही सीरिज केवळ मनोरंजन नव्हे, तर अध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे यात शंका नाही.