मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटापुढे अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ‘बच्चन पांडे’ (Bacchan Pandey) टिकू शकला नाही. ११ मार्चला प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्सने २०० कोटींचा गल्ला जमवला असला तरी बच्चन पांडे अद्याप ५० कोटींचा पल्लाही पार करु शकलेला नाही. आपला चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुख अक्षय कुमारने व्यक्त केले आहे. काश्मीर फाईल्समुळे आपला चित्रपट बुडाला, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.
मात्र तरीही विवेक अग्निहोत्रीचे मानले आभार
एका कार्यक्रमात अक्षयकुमार म्हणाला की- द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी हिंदू पंडितांसोबत झालेल्या अत्याचाराचे सत्य दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एखाद्या आशीर्वादासारखा आहे. मात्र द काश्मीर फाईल्सने, माझा सिनेमा बच्चन पांडेची वाईट अवस्था केली आहे. मात्र तरीही मी विवेक अग्निहोत्रीचे आभार व्यक्त करतो की, त्याने काश्मीर फाईल्ससारखा सिनेमा तयार करुन, आपल्या देशातील एक दुखदायक सत्य समोर आणले आहे.
१६० कोटी बच्चन पांडेचे बजेट
१५ दिवसांत द काश्मीर फाईल्सने २११ कोटी जमा केले आहेत. तर बच्चन पांडे केवळ ४९ कोटींवर अडकून आहे. बच्चन पांडे सिनेमाचे बजेट १६० कोटी रुपये होते. त्याची कमाई पाहता हा चित्रपट फ्लॉप झाला असाच निष्कर्ष सध्या तरी काढण्यात येतो आहे. दुसरीकडे काश्मीर फाईल्सचे बजेट केवळ १२ कोटी होते, त्यापेक्षा २०० कोटींची अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे.
काश्मीर फाईल्सच्या वादळात बच्चन पांडे उडाला
अक्षय कुमारचा बच्चन पांडे धुळवडीच्या दिवशी प्रदर्शित झाला. पण द काश्मीर फाईल्सच्या चर्चेत अक्षयच्या सिनेमाकडे अनेकांनी पाठ फिरवली. अक्षयसारखी मोठी स्टार कास्ट असूनही सिनेमागृहात प्रेक्षक फिरकलेच नाहीत. तर द काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी एडव्हान्स बुकिंग होत होते. मात्र आता आरआरआर या सिनेमाची टक्कर द काश्मीर फाईल्सला मिळताना दिसते आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी काश्मीर फाईल्सच्या गल्ल्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी केवळ ४.५ कोटींचा गल्लाच सिनेमाला जमवता आला.