(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
१९९१ मध्ये आलेला “लम्हें” हा चित्रपट प्रचंड गाजला. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अनुपम खेर यांच्यासह इतर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. अभिनेता-निर्माता फरहान अख्तरने या चित्रपटाद्वारे सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंग यांच्या सहाय्यक म्हणून काम करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
आता, अभिनेत्याने अलीकडेच एका मुलाखतीत चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला. फरहान अख्तरने स्पष्ट केले की, चित्रीकरणादरम्यान श्रीदेवी सेटवर घसरून पडल्या आणि त्या क्षणी त्याला वाटले वाटले की त्याचे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपले आहे. जेव्हा अभिनेत्री उठलया आणि त्यांनी जे सांगितले ते ऐकले तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.
खरं तर, फरहान अख्तर अलीकडेच ‘आप की अदालत’ या शोमध्ये दिसला, जिथे त्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने, असा अपघात घडला. यश चोप्रा यांनी सेट लावला होता. सरोजजी गाण्याची कोरिओग्राफी करीत होत्या. श्रीदेवींना त्या गाण्यातून राग आणि दु:ख या दोन्ही भावना दाखवायच्या होत्या. तो शेवटचा सीन होता, क्रेन शॉट होता.”
त्या दृश्यात श्रीदेवी यांना काही वाईट बातमी ऐकल्यानंतर नृत्याद्वारे त्यांचा राग आणि वेदना व्यक्त करत असल्याचे दाखवण्यात आले होते. शेवटचा क्रेन शॉट होणार होता. श्रीदेवी सराव करत असताना, मनमोहन सिंग फ्रेम तपासत होते आणि त्यांना लाकडी फरशीवर एक डाग दिसला. त्यांनी कोणालातरी ते स्वच्छ करण्यास सांगितले आणि मी सर्वात जवळ असल्याने ते पुसण्यासाठी धावलो.”
फरहानने पुढे स्पष्ट केले की घाईघाईत त्याला श्रीदेवी जवळ येताना दिसल्या नाहीत. अभिनेता म्हणाला, “मी खाली वाकून डाग साफ करत होतो, जेव्हा त्या तिथे आल्या आणि घसरून पडल्या. मला अजूनही आठवते की ते सर्व स्लो मोशनमध्ये होते… श्रीदेवी हवेतून उडत जमिनीवर पडल्या. संपूर्ण सेट शांत झाला. मला वाटले की माझे करिअर संपले आहे.”






