(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या जबरदस्त अभिनयाचे चाहते आजही त्याचे मोठे फॅन आहेत. मात्र, त्याचा चित्रपटकारकिर्दीचा प्रवास काही विशेष राहिला नाही. अलीकडच्या काळात विवेक ओबेरॉय फारच कमी चित्रपटांमध्ये दिसतो आणि तो रिअल इस्टेटचा व्यवसायही सांभाळत आहे.
सध्या तो काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, त्यापैकीच दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा तब्बल ४००० कोटींचा ‘रामायण’ हा महागडा चित्रपट आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय विभीषणची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटासाठी विवेक ओबेरॉय याने किती मानधन घेतले आहे, याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय याने एका मुलाखतीत सांगितलं की त्याने ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांना स्पष्टपणे सांगितले होते की, तो या चित्रपटासाठी एक पैसाही मानधन म्हणून घेणार नाहीत.’ विवेक याने सांगितले की तो आपल संपूर्ण मानधन कॅन्सरग्रस्त मुलांच्या मदतीसाठी दान करणार आहे.
विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी नमितजींना सांगितलं की मला हा प्रोजेक्ट खूप आवडतो आणि मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करू इच्छितो. मला वाटतं की हा चित्रपट भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेईल. जसं हॉलीवूडमध्ये महाकाव्यांवर चित्रपट तयार होतात, तसंच रामायण हे भारताचं उत्तर ठरेल. हा प्रोजेक्ट अशा कंपनीशी संबंधित आहे ज्यांनी आतापर्यंत ७-८ ऑस्कर जिंकले आहेत आणि अनेक उत्कृष्ट कामं केली आहेत. खरं तर रामायणपेक्षा मोठं आणि भव्य काही असूच शकत नाही. हा प्रोजेक्ट ग्लोबल स्तरावर नेणं खूपच रोमांचक आहे.”
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा ‘रामायण’ हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात भव्य आणि महागडा प्रकल्प ठरणार आहे. तब्बल ४,००० कोटींच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान आणि विक्रांत मॅसी मेघनाद यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग २०२७ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.






