(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनला त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार 2025 मध्ये त्यांना ‘मोस्ट व्हर्सटाइल ॲक्टर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय सिनेमातील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करणारा हा भव्य पुरस्कार समारंभ 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईच्या वर्ली येथील NSCI डोम, SVP स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी देण्यात आला.
अभिनेत्याला कधी सन्मानित करण्यात आले?
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२५ समारंभ ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील एसव्हीपी स्टेडियममध्ये पार पडला. अल्लू अर्जुनने या सन्मानाबद्दल आयोजकांचे आणि त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट शेअर करून लिहिले, “हा पुरस्कार माझ्या चाहत्यांसाठी आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” असे लिहून अभिनेत्याने सगळ्यांचे आभार मानले आहे.
अल्लू अर्जुनला यापूर्वी SIIMA पुरस्कार मिळाला
याआधी, अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि ‘पुष्पा २: द रूल’ साठी तेलंगणा फिल्म अवॉर्ड्स मिळाला होता. ‘पुष्पा २: द रूल’ २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, जगपती बाबू, सुनील आणि राव रमेश यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
अल्लू अर्जुनची कारकीर्द
अल्लू अर्जुनने विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये आणि भाषांमध्ये केलेल्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखले जाते. त्यांनी ॲक्शनपासून ते भावनिक भूमिकांपर्यंत प्रत्येक पात्र उत्कृष्टपणे साकारले आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांना आवडतो, आणि त्यामुळे हा अभिनेता आज भारतातील सर्वात दमदार आणि प्रतिभावान कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
हा सन्मान अल्लू अर्जुनच्या तेजस्वी कारकिर्दीतील आणखी एक मोठे यश ठरले आहे. यामुळे अभिनेत्याची ओळख एका उत्कृष्ट अभिनेत्याच्या रूपात अधिक बळकट झाली आहे, जो कोणतेही पात्र सहजतेने साकारू शकतो आणि ज्याचे काम थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे असेल.






