शिक्षण व्यवस्थेवर पेपरफुटीचा घाला! 'डॉक्टर' होण्याचं स्वप्न धुळीस, वैद्यकीय प्रवेशाऐवजी 'या' क्षेत्राला पसंती, विद्यार्थी-पालक संतप्त
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: भविष्यातील ‘धन्वंतरी’ घडवणाऱ्या देशभरातील शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘पेपरफुटीची‘ कीड आता विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर उठली आहे! वारंवार फुटणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरमुळे संपूर्ण देशात संतापाचा वणवा पेटला असून, लाखो गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी सापडले आहे. रात्रं-दिवस एक करून, रक्ताचे पाणी करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गलथान कारभारामुळे अत्यंत भयानक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या सावळ्या गोंधळाला कंटाळून अखेर देशातील तरुण पिढीने एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. सततचा मनस्ताप, अनिश्चितता आणि पेपरफुटीच्या टोळ्यांचा उच्छाद पाहून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी ‘डॉक्टर’ होण्याचा विचार सोडून थेट इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रांकडे मोर्चा वळवला आहे. वैद्यकीय क्षेत्रात जाणारा हा मोठा बौद्धिक वर्ग अशा प्रकारे माघार घेत असेल, तर हा या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि शिक्षण व्यवस्थेवर झालेला सर्वात मोठा आघात आहे!
CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट
आपल्या मुलाच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी आयुष्यभराची पुंजी, दागदागिने गहाण ठेवून महागड्या कोचिंग क्लासेसचे लाखो रुपयांचे शुल्क भरणाऱ्या पालकांचा संयम आता पूर्णपणे सुटला आहे. “आमच्या घामाच्या पैशांची आणि मुलांच्या भविष्याची थट्टा मांडली आहे का?” असा थेट सवाल करत, संतापलेल्या पालकांनी “आम्हाला क्लास आणि परीक्षेचा झालेला सर्व खर्च परत करा!” अशी आक्रमक मागणी लावून धरली आहे. शिक्षण माफियांच्या घशात जमा झालेला हा पैसा आणि विद्यार्थ्यांचे वाया गेलेले वर्ष याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
केंद्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षांमधील अनागोंदी कारभार पाहता, “अशा भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर भरोसा कसा ठेवायचा?” असा आर्त टाहो विद्यार्थी फोडत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा संस्था विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यात पार अपयशी ठरल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. या भयानक परिस्थितीवर उपाय म्हणून आता देशभरातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्र येत ‘प्रत्येक राज्याची स्वतंत्र CET परीक्षा घेण्यात यावी’ अशी एकमुखी आक्रमक मागणी लावून धरली आहे. राज्याची परीक्षा राज्यापुरती मर्यादित राहिल्यास किमान पारदर्शकता आणि सुरक्षितता तरी टिकून राहील, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटत आहे.
परीक्षा पद्धतीतील भ्रष्टाचाराचे हे समूळ उच्चाटन झाले नाही, आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर हा विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही! लाखो तरुण जर आपल्या हक्काच्या शिक्षणासाठी आणि न्यायासाठी आज नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात असतील, तर प्रशासनाला आणि सरकारला जागे व्हावेच लागेल. अन्यथा, देशाची ही सुशिक्षित तरुण पिढी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय राहणार नाही, हाच स्पष्ट इशारा या उठावातून मिळत आहे!






