(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
पॉप गायक एड शीरन सध्या त्यांच्या भारत भेटीचा पुरेपूर आनंद घेत आहेत. अलीकडेच तो प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक अरिजित सिंगसोबत स्कूटर राईडचा आनंद घेताना दिसला. अरिजीतने त्याला त्याच्या गावी जियागंज (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) येथे स्कूटर राईड दिली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
व्हिडिओची चाहत्यांमध्ये वाढली चर्चा
दोन्ही गायकांच्या स्कूटर राईडचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये तो त्याच्या सहलीचा आनंद पूर्ण मजेत घेताना दिसत आहे. एड शीरनने त्याच्या सुरक्षा पथकाला सोडून अरिजितसोबत स्कूटर आणि बोट राईडचा आनंद घेतला आणि या दरम्यान त्यांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.
स्थानिक रहिवासी पाहून आश्चर्यचकित झाले
बेंगळुरूमध्ये पोलिसांनी स्ट्रीट शोवर बंदी घातल्यानंतर एड शीरन पश्चिम बंगालमध्ये अरिजीत सिंगसोबत दिसला. कोणत्याही सुरक्षेशिवाय ब्रिटिश गायकाला मुक्तपणे फिरताना पाहून स्थानिक रहिवासी आश्चर्यचकित झाले.
पाच तास होते एकत्र
एड शीरन आणि अरिजीत सिंग यांच्यात खूप मैत्री आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये लंडनमध्ये एका मंचावर एकत्र गायल्यानंतर त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांची हिट गाणी गायली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एड शीरनने जियागंजमध्ये सुमारे पाच तास घालवले, त्यादरम्यान त्याने अरिजीतसोबत स्कूटर आणि बोट राईड केली.
एड शीरन या शहरांमध्ये करणार सादरीकरण
एड शीरनने त्याच्या बेंगळुरू कॉन्सर्टपूर्वी चर्च स्ट्रीटवर एक आश्चर्यकारक सादरीकरण केले. तथापि, पोलिसांनी त्याचा कार्यक्रम मध्येच थांबवला. यानंतर, त्याने शिल्पा रावसोबत ज्युनियर एनटीआरचे तेलुगू गाणे ‘चुट्टमल्ले’ सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. एड शीरनने हैदराबाद आणि चेन्नईमध्ये दोन संगीत कार्यक्रम सादर केले आहेत आणि आता तो १२ फेब्रुवारी रोजी शिलाँगमध्ये आणि १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये सादरीकरण करण्यास सज्ज आहे.