
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Somy Ali on Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी सोमी अलीने सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिल्याचा दावा करत काही नवे आरोप केले आहेत.
निधी वासंदानी यांना दिलेल्या मुलाखतीत सोमी अली म्हणाली, “मी सलमान खानला त्याच्या खासगी नंबरवर मेसेज केला होता. मी त्याला सांगितले की अजूनही वेळ गेलेली नाही. बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन तू जे काही चुकीचे केले आहेस, त्यासाठी माफी माग. सर्व काही ठीक होईल. पण त्याने माझं ऐकलं नाही.”
सोमीने सांगितले की, तिने केवळ सलमानलाच नव्हे तर बिश्नोई समाजालाही आवाहन केले होते. ती म्हणाली, “सलमानला मारल्याने तुमचे काळे हरिण परत येणार नाही. मी हात जोडून विनंती करते की, कृपया त्याला माफ करा. माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले, पण त्याच्याकडून मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.”
यानंतर तिने सलमानबाबत आणखी काही गंभीर दावे केले. “तो मला पुढे जाऊ देत नाही. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर तो दुबईला गेला आणि तिथे माझ्या सावत्र बहिणीला भेटला. तो कायम माझ्याशी संपर्कात राहण्याची संधी शोधत असतो. मी मरेपर्यंत तो माझा पाठलाग करणं थांबवणार नाही,” असा दावा सोमी अलीने केला. तसेच, “सलमान सर्वात मोठा कंजूस आहे,” असेही ती म्हणाली.
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजस्थानातील जोधपूर येथे दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानत असल्याने या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला.
२०१८ मध्ये जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणामुळे सलमानला गेल्या काही वर्षांत अनेक कथित जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत.
भाईजानच्या भाऊच्या यातना! ‘लहानपणी झालं यौन शोषण’ अखेर Sohail Khan बोललाच; सगळं केलं स्पष्ट
१९९० च्या दशकात सलमान खान आणि सोमी अली रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सोमी अलीने विविध मुलाखती आणि सोशल मीडियावर सलमानवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, सलमान खानने या आरोपांवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.