(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा आज 60 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा वाढदिवस शहरापासून दूर असलेल्या त्याच्या पनवेल फार्महाऊसवर एका भव्य उत्सवात साजरा केला. अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसाची सुरुवात त्याच्या कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपट उद्योगातील मित्रांच्या उपस्थितीत एका भव्य मध्यरात्रीच्या पार्टीने केली. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने सलमानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून खूप घट्ट मैत्री आहे. अलिकडेच रितेशने बिग बॉस 19 च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी रितेश आणि सलमान खानचे बॉण्डिंग पाहायला मिळाले. आज भाईजानच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुखने सलमान खानसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये रितेश ने लिहिले, “My Dearest भाऊ! तुमच्या आयुष्यातील हा खास दिवस प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेला असूदेत. तुम्ही माझ्यासाठी काय आहात…हे मी खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही. भाऊ, तुम्ही मला कायम माझ्या मोठ्या भावासारखा पाठिंबा दिलात, नि:स्वार्थपणे मदत केलीत. मला तुमच्या कुटुंबाचा एक भाग समजलात…आय लव्ह यू भाऊ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
अशा शब्दात रितेशने सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. तर जिनिलीयाने देखील सलमान खानसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. जिनिलिया म्हणते, ”ज्या माणसाचं मन सर्वात मोठं आहे…अशा सलमान खानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आमच्या कायम पाठिशी राहिलात त्यासाठी खूप आभार…आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. Happy Birthday Salman”
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे आणि हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिवसानिमित्त प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान लहानशा पण महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. सलमानला पापाराझींनी सुद्धा ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं.






