फोटो सौजन्य - Social Media
‘एनटीआरनील’चा पहिला झलक व्हिडीओ १९ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे २० मे रोजी Jr. NTR यांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या झलक व्हिडीओला मोठं पॅन-इंडिया स्वरूप दिलं असून तो तेलुगू, हिंदी, कन्नड, तमिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये या व्हिडीओबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर ‘एनटीआरनील’ची सतत चर्चा रंगताना दिसत आहे. प्रत्येक नव्या अपडेटची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना आता झलक व्हिडीओच्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे. Jr. NTR यांची दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि Prashanth Neel यांची भव्य अॅक्शन शैली यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः ‘केजीएफ’ आणि ‘सलार’सारखे भव्य चित्रपट दिल्यानंतर प्रशांत नील यांच्या या नव्या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
या चित्रपटात Jr. NTR मुख्य भूमिकेत झळकणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी Prashanth Neel यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि NTR Arts यांच्या बॅनरखाली करण्यात येत आहे. चाहत्यांना आता या चित्रपटाच्या झलक व्हिडीओची आणि पुढील मोठ्या घोषणांची उत्सुकता लागून राहिली आहे.






