फोटो सौजन्य - Social Media
“आम्ही सेटवर १५ ते २० आंबे खाल्ले आणि खूप धमाल केली,” अशी मजेशीर कबुली देत छवी आणि अनिकेत यांच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी जिंकून घेईन सारं या मालिकेत सध्या भावना, नाती आणि रहस्यांचा रोमहर्षक प्रवास पाहायला मिळत आहे. लग्नात घडलेल्या घटनांनंतर वत्सला घर सोडण्याचा निर्णय घेते, तर शांभवी आणि छवी यांच्या नात्यातही नवे वळण येताना दिसते. घरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचे लक्ष विशेषतः छवी आणि अनिकेत यांच्या बदलत्या नात्याकडे वेधले गेले आहे.
सततचे वाद, टोमणे आणि हलक्या-फुलक्या भांडणांतून सुरू झालेले हे नाते आता हळूहळू मैत्री आणि जवळीकतेकडे वळताना दिसत आहे. या बदलत्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. या नात्याबद्दल बोलताना छवीची भूमिका साकारणारी जान्हवी आणि अनिकेतची भूमिका करणारा संचित यांनी सेटवरील त्यांच्या मैत्रीचे अनेक मजेशीर किस्से शेअर केले. जान्हवीने सांगितले की, “छवी आणि मी प्रत्यक्ष आयुष्यात खूप वेगळ्या आहोत. आमची मैत्री नैसर्गिक आहे आणि तीच स्क्रीनवरही दिसते. आम्ही अनेकदा सेटवर टॉम अँड जेरीसारखे भांडतो.”
ती पुढे म्हणाली, “संचित सेटवर खूप मस्तीखोर आहे. शूटिंगदरम्यान वेळ मिळाला की आम्ही म्युझिक लावतो, डान्स करतो आणि खूप एन्जॉय करतो.” सध्या आंब्यांचा हंगाम असल्याने सेटवरही खास उत्साहाचे वातावरण आहे. कोकणातून आलेल्या जान्हवीने सांगितले की तिला हापूस आंबा खूप आवडतो आणि सेटवर रोज आंबे येतात, ज्याचा सर्वजण मनसोक्त आनंद घेतात.
संचितनेही एक मजेशीर खुलासा करत सांगितले की, एका शूटिंग सीक्वेन्सदरम्यान त्यांनी आमरस बनवला आणि त्याचवेळी छवी- अनिकेत यांची केमिस्ट्री प्रत्यक्षातही अधिक खुलली. “त्या दिवशी आम्ही साधारण १५ ते २० आंबे खाल्ले आणि खूप धमाल केली,” असे त्याने सांगितले. या मालिकेत आता छवी आणि अनिकेत यांच्या नात्यात गोडवा आणि भावनिक बदल पाहायला मिळणार असून, त्यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.






