(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री, निर्माती आणि UNFPA इंडिया ची ऑनरेरी अॅम्बेसेडर असलेली कृती सेनन हिने वर्ल्ड हेल्थ समिट 2025 मध्ये भाग घेऊन इतिहास रचला आहे. ती या मंचावर बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. तिने या जागतिक व्यासपीठाचा वापर महिलांच्या आरोग्यात ठोस आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज अधोरेखित करण्यासाठी केला. तिने या गुंतवणुकीचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम देखील अधोरेखित केला.
“Women’s Health – Global Wealth: Catalyzing Returns on Bold Investments” या उच्चस्तरीय सत्रात बोलताना कृती सेनन म्हणाली की, “जगाची अर्धी लोकसंख्या महिलांची असूनही त्यांच्या आरोग्यावर फारसा खर्च होत नाही.” आपल्या भाषणात तिने सांगितले, “महिलांचे आरोग्य ही किरकोळ गोष्ट नाही. ते मानवजातीच्या प्रगती, समृद्धी आणि भविष्यासाठीचा पाया आहे.”
तिने एका महत्त्वाच्या आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की, महिलांच्या आरोग्यावर प्रत्येक 300 मिलियन डॉलरची गुंतवणूक सुमारे 13 बिलियन डॉलरचा परतावा देऊ शकते. म्हणजे जवळपास नऊ पटीने वाढ. ती म्हणाली, “महिलांच्या आरोग्यावर गुंतवणूक करणे म्हणजे केवळ योग्य काम करणे नाही, तर आपल्या सामूहिक भविष्यासाठी एक शहाणपणाचा निर्णय आहे. जेव्हा महिला निरोगी असतात, तेव्हा त्या प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत कुटुंब, समाज आणि अर्थव्यवस्थाही पुढे जाते. आपल्याला केवळ आकडे दाखवण्यात न थांबता धाडसी आणि स्पष्ट कृती करावी लागेल.”
सेनन पुढे म्हणाली, “तिच्यासाठी काही नाही, तर तिच्याशिवाय काही नाही,” आणि यावर भर दिला की महिलांना त्यांच्या आरोग्याशी आणि शरीराशी संबंधित निर्णयांमध्ये सहभागी करणे अत्यावश्यक आहे. तिने आपल्या अलीकडील प्रवासांचे अनुभव शेअर केले, जिथे तिने बालविवाह, मातृत्व आरोग्याच्या सेवांची कमतरता आणि तरुण मुलींच्या आरोग्याच्या गरजांकडे होणारे दुर्लक्ष यांसारख्या वास्तवाचा सामना केला. या कहाण्यांमधून तिने दाखवून दिले की योग्य वेळी घेतलेले निर्णय जीवन बदलू शकतात.
या परिषदेत कृती सेननची उपस्थिती दर्शवते की भारताची भूमिका आणि महिला व आरोग्याच्या मुद्द्यांवरची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऐकली जात आहे. UNFPA इंडिया च्या अॅम्बेसेडर म्हणून, ती सर्वांसाठी लैंगिक व प्रजनन आरोग्य, सुरक्षित मातृत्व सेवा आणि किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्यविषयक निर्णयांमध्ये सामावून घेण्यासाठी कार्यरत आहे