 
        
        (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अफाट प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आहे, परंतु एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी या ग्लॅमरस जगाला निरोप दिला आणि स्वतःला पूर्णपणे देवाच्या उपासनेसाठी समर्पित केले. असेच एक नाव टेलिव्हिजनच्या जगात आहे. अभिनेत्री नुपूर अलंकार ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकांमधील भूमिका साठी ओळखली जाते. नुपूरने २०२२ मध्ये संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. तिने १५० हून अधिक टीव्ही शोमध्ये तिच्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आणि तिच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले. तिने दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.
नुपूर म्हणाली की, अभिनय क्षेत्रात असतानाही ती शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक जीवन जगत होती, पण काही घटनांनी तिला संन्यास घेण्यास प्रवृत्त केलं. PMC बँक घोटाळा, आई आणि बहिणीचा मृत्यू या घटनांमुळे तिने संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले, “माझ्या आयुष्यात जे काही घडले, ते सगळं गुगलवर सापडेल. हे सगळं PMC बँक घोटाळ्यापासून सुरू झालं. त्या घटनेनंतर आयुष्याचं कठोर वास्तव समोर आलं. या घोटाळ्यानंतर माझी आई आजारी पडली, तिच्या उपचारासाठी आर्थिक समस्या आल्या. याचदरम्यान माझ्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झाला. हेच निमित्त ठरलं. असाही मला सांसारिक जीवनात रस उरला नव्हता. त्यामुळे मी माझ्या पतीची परवानगी घेऊन आध्यात्मिक मार्गावर निघाले.मी या भौतिक जगापासून दूर गेल्यानंतर आयुष्य सोपं झालं. आधी वीजबिलं, लाइफस्टाइलचे खर्च, डायट्स — सगळं जपावं लागायचं. आता माझा महिन्याचा खर्च १०-१२ हजार आहे.”
2022 मध्ये अभिनेत्रीने अभिनयाच्या दुनियेतून दूर जाऊन अध्यात्माकडे वळले. तिने स्वत:ला पूर्णपणे देवाच्या भक्तीत लीन केले. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ती भिक्षा मागताना दिसते, आणि हे फोटो तिच्या संन्यास घेण्याआधीच्या पहिल्या दिवशीचे आहेत. या फोटोमध्ये तिला सहा लोक भिक्षा देताना दिसत आहेत.आता अभिनेत्री आपला पूर्ण वेळ देवाची आराधना करत घालवते आणि भिक्षा मागून आपला भूक भागवते.






