(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या चित्रपटांचा यशाचा आलेख नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. मनोरंजनासोबतच भावनिक आणि सामाजिक पातळीवर प्रेक्षकांना विचार करायला लावणारे चित्रपट देणे हीच त्यांची ओळख आहे. त्यांच्याच अशा संस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पीके’, जो २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘पीके’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता, तर समाजातील अंधश्रद्धा, धार्मिक ढोंग आणि विचारसरणीवर थेट प्रश्न उपस्थित करणारा होता. त्यामुळेच आजही या चित्रपटातील आशय आणि संदेश तितकाच प्रभावी वाटतो.
‘पीके’च्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त या चित्रपटातील लक्षात राहिलेल्या व्यक्तिरेखांना पुन्हा उजाळा देण्याची ही योग्य वेळ आहे. त्यापैकी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे संजय दत्तने साकारलेला भैरों सिंह. नुकत्याच समोर आलेल्या बिहाइंड-द-सीन्स (BTS) व्हिडीओमध्ये संजय दत्त या भूमिकेत शिरण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांची सहज, प्रामाणिक अभिनयशैली पाहायला मिळते.
चित्रपटात भैरों सिंहच्या रूपात संजय दत्त याने दाखवलेली साधेपणा, माणुसकी आणि भावनिक खोली प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेली होती. विशेष म्हणजे, हेच गुण त्यांच्या खऱ्या आयुष्यातही जाणवतात. भैरों सिंह ही संजय दत्तच्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय भूमिका ठरली आहे, जी कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ हा त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, बोमन ईरानी, सौरभ शुक्ला आणि संजय दत्त यांसारख्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट एक उत्कृष्ट कौटुंबिक मनोरंजनपट ठरला. धार्मिक अंधश्रद्धा आणि ढोंगी बाबांवर केलेले स्पष्ट भाष्य, सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘पीके’ त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला.






