(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणावादरम्यान, चित्रपट, टीव्ही आणि युट्यूब जगतातील प्रसिद्ध कलाकारांनी पुढे येऊन भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेक पोस्ट शेअर केल्या. तसेच रणवीर अलाहबादियाने देखील देशभक्ती दर्शविणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या, तर दुसरीकडे त्याने पाकिस्तानच्या नावाने एक पोस्ट शेअर केली जी नंतर त्याला डिलीट करावी लागली. या पोस्टनंतर रणवीर खूप ट्रोल झाला आणि भारतीयांनी त्याला आता फटकारले आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.
युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांनी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते, ‘माझ्या प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, मला माहित आहे की यावर बरेच भारतीय माझ्यावर रागावतील, परंतु हे सांगणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे अनेक भारतीयांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही, तसाच माझ्या मनातही नाही.’
तसेच त्याने पुढे लिहिले, ‘आपल्यापैकी अनेकांना शांती हवी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचे स्वागत करता. पण… तुमचा देश सरकार चालवत नाही. ते तुमचे सैन्य आणि तुमची गुप्त सेवा (ISI) चालवते. सरासरी पाकिस्तानी या दोन्ही संस्थांपेक्षा खूप वेगळा आहे.’
रणवीर अलाहबादियाने पुढे त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, सरासरी पाकिस्तानी माणसाच्या मनात शांती आणि समृद्धीची स्वप्ने असतात. स्वातंत्र्यापासून या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. ते भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी सतत जबाबदार राहिले आहेत. पुढील स्लाईडमध्ये पुरावा.
पुरावे सादर करताना त्याने लिहिले, “पुरावा १: गेल्या काही वर्षांत पकडलेले सर्व दहशतवादी मूळचे पाकिस्तानचे आहेत. पुरावा २: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख हाफिज अब्दुल रौफ याच्या राजकीय अंत्यसंस्कारात तुमचे लष्करी नेते सहभागी झाले होते. पुरावा ३: तुमचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच स्काय न्यूजवर राज्य-पुरस्कृत दहशतवादाची कबुली दिली. पण मला त्यांची नाही तर तुमची काळजी आहे. जर असे वाटत असेल की आपण द्वेष पसरवत आहोत तर मी मनापासून माफी मागतो. पाकिस्तानी लोकांना भेटलेले भारतीय तुम्हाला समजतात. पण सध्या भारतीय आणि पाकिस्तानी मीडिया (वृत्तवाहिन्या) खोटेपणा पसरवत आहेत. आपल्यातील बहुतेक लोक सीमेजवळील निष्पाप लोकांसाठी शांती इच्छितात. परंतु भारताला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा राज्य-पुरस्कृत दहशतवाद देखील संपवायचा आहे.” असे त्याने त्याच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘Raid 2’ ची मजबूत पकड, ९ व्या दिवसापेक्षा चित्रपटाची १० व्या दिवशी एवढी कमाई!
रणवीर अलाहबादियाची ही पोस्ट भारतीय लोकांना आवडली नाही. रणवीरला पाकिस्तानी लोकांबद्दल असलेले प्रेम आणि सहानुभूती त्याला खूप महागात पडली. लोकांनी त्याच्यावर राग व्यक्त केला आणि सोशल मीडियावर त्याला खूप फटकारले. सोशल मीडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केल्यानंतर, रणवीर अलाहबादियाला त्यांची पोस्ट डिलीट करावी लागली. त्याने पाकिस्तानी जनतेला उद्देशून लिहिलेला संदेश डिलीट केला, पण त्याचा फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.