Karate Expert And Actor Shihan Hussaini Passes Away After Battle With Cancer
प्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आहे. प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते शिहान हुसैनी यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून ब्लड कॅन्सर या आजाराशी लढत होते, त्यांची ही झुंज आता अपयशी ठरली आहे. चेन्नईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शिहान हुसैनी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताची पृष्टी केली आहे.
IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी ‘गुड न्यूज’; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
शिहान हुसैनी यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांवर आणि त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईतील बेसंत नगरमधील हायकमांड येथे त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आणि चाहते अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करू शकतील. त्यानंतर त्यांचे पार्थिव मदुराई येथे नेण्यात येईल आणि तिथे त्यांच्यावर संध्याकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार केले जातील. शिहान हे त्यांच्या कुटुंबीयांच्या खूप जवळचे व्यक्ती होते. शिहानला टॉलिवूड इंडस्ट्रीत मोठे स्थान होते. त्यांनी अनेक दिग्गज सुपरस्टार्सना मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले होते. त्या यादीमध्ये पवन कल्याण आणि थलापती विजय सारख्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
दरम्यान, हुसैनी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. “मला कळवताना खूप दुःख होत आहे की एचयू आम्हाला सोडून गेले आहेत. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत हायकमांड, बेझंट नगर येथील त्यांच्या घरी असेल,” असं त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. कराटे चॅम्पियन असलेल्या शिहान हुसैनी यांनी धनुर्विद्येचं शिक्षणही घेतलं होतं. ते कराटे आणि धनुर्विद्येचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यांच्या मृत्यूनंतर कराटे आणि धनुर्विद्येने त्यांना आदरांजली वाहून त्यांना सलामी देण्याची विनंती विद्यार्थ्यांना कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
हुसैनी यांनी १९८६ मध्ये रिलीज झालेल्या कमल हासन यांच्या ‘पुन्नागाई मन्नन’चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्या ‘वेलईकरन’, ‘ब्लडस्टोन’ या तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं. विजयच्या ‘बद्री’मध्ये त्यांनी कराटे प्रशिक्षकाची भूमिका केली होती. विजय सेतुपतीचा ‘काथुवाकुला रेंडू काधल’ आणि ‘चेन्नई सिटी गँगस्टर्स’ हे त्याने अभिनय केलेले त्याचे शेवटचे सिनेमे होते.