vishakha subhedar shared marathi language controversy regards post actress urges to parents
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये राज्य सरकारने त्रिभाषा सुत्राबाबत निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनी, मराठी सेलिब्रिटींनी आणि सामान्य नागरिकांनीही या निर्णयाला विरोध केला होता. निर्णयाला विरोध होत असताना, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. हिंदी भाषेची अप्रत्यक्ष सक्ती केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण कमालीचं तापलं होतं. हेमंत ढोमे, तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, केदार शिंदे, रवी जाधव यांसारख्या कलाकारांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात पोस्ट शेअर करत आपलं ठाम मत मांडलं होतं. आता लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारने याप्रकरणी सविस्तर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने महाराष्ट्राच्या घराघरांतील पालकांना विशेष आवाहन केलं आहे. आपण सर्वप्रथम मुलांवर चांगले संस्कार करणं महत्त्वाचं आहे, त्यांना सरस्वती मंत्र शिकवला पाहिजे जेणेकरून; जिभेला वळण लागेल, आपल्या मराठी भाषेची मुलांना नव्याने ओळख होईल असं अभिनेत्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बाकी सगळं बाजूला ठेवूया…
सक्ती वगैरे…
पण मला काय वाटतं, महाराष्ट्रात आपण कुठे सक्तीने मराठी बोलतोय?? बोलायला हवं.
चला, जगाच्या स्पर्धेमुळे भाषेला मर्यादा येते. मग इंग्रजी मीडियममध्ये घाला मुलांना. पण संस्कार तर आपले करा.
मला अजून आठवतं, आम्हाला शाळेत गणपती अथर्वशीर्ष शिकवायचे. मारुती स्तोत्र, रामरक्षा असे बरेच काही श्लोक, त्यामुळे जिभेला वळण होतं.
आता??
हल्लीच साऊथमधल्या एका माणसाबद्दल मला कळलं. तो माणूस सगळ्या शाळांमध्ये सरस्वती मंत्र शिकवतो. त्याचं पाठांतर मुलांकडून करून घेतो आणि नित्य नेमाने म्हणायला सांगतो. शाळेत प्रार्थनेमध्ये सरस्वती प्रार्थना संलग्न करावयाला सांगतो…! बरं ह्याचा उपयोग काय?
तर सरस्वती देवता विद्येची देवता आहे. तिची स्तुती केली तर ती जरूर प्रसन्न होऊन मेंदू तल्लख करेल. अभ्यासाची गोडी लागेल. किती मोठा विचार आहे हा. पुन्हा एकदा संस्कार बीज रोपण सुरु केलंय त्यांनी. मग आपणही करून बघायला काय हरकत आहे? आता तुम्ही म्हणाल, असे मंत्र म्हणून का हुशार होतं कोणी.. बघा हं.. इतकी फुकाची बडबड आपण करतोच की. एक मंत्र म्हणायला काय जाणार आहे? म्हणून बघायला काय हरकत आहे? पूर्वी आपल्याला शाळेत होती की प्रार्थना…
“यां कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥१॥
त्याची जागा आता “हमको मन की शक्ती दे ना जय विजय करे, दुसरों की जय से पहले खुदकी जय करे” ह्याचा खरा अर्थ मुलांना इतक्या कमी वयात नाही कळायचा.
त्यांना असं वाटेल, दुसऱ्यांची नाही आधी स्वतःची जय करा.. किंवा आधी स्वतः.. ते अगदी वैश्विक सत्य जरी असले, नव्हे आहेच.. पण त्याआधी माणुसकी, कर्म, फळ ह्याचं गणित त्यांनी मांडलेलंच नाहीय. तर हा ह्याचा अर्थ कसा कळायचा?? त्यांना तो स्वार्थ नाही का वाटणार? स्वतः म्हणजे मी.. मी म्हणजे कोण? हे अजून वय वर्षे ५० असलेल्या माणसालाही नाही कळत. तर ह्या १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कसं कळणार?
आपल्या मुलांना सरस्वती मंत्र शिकवूया,
सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि । विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा |
चला, तुम्ही त्याला मंत्र नका म्हणू, प्रार्थना म्हणा..! ती पुन्हा शाळांमध्ये सुरु व्हावी. मग मिडियम कुठलं का असेना.. ह्यासाठी प्रयत्न करूया.. ते ही नसेल होत, तर घरी तर म्हणू शकतो..! संस्कार तर वेदांमध्ये जे आहेत ते होतील..
काय वाटतं???
आता ह्यावर माझ्या मुलाला येतो का हा श्लोक? असे प्रश्न विचारून या विषयाचं गांभीर्य कमी करू नका. आपण आपली भाषा, आपले संस्कार, आपली संस्कृती आपण जपूया.
माझा मुलगा गुरुकुल शाळेत शिकलाय. मराठी माध्यम.
बस इतकंच पुरेसं आहे.
#मराठी #मराठीभाषा #संस्कार #महाराष्ट्र