Hera pheri 3 paresh rawal returns his signing amount of 11 lakh to film makers and know the reason behind exit
‘हेरा फेरी ३’ची चर्चा होत असल्यापासून चाहते कमालीचे आनंदित होते. पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकुट एकत्र दिसणार म्हणून चाहते या चित्रपटासाठी आनंदितही होते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपट सोडल्याचे वृत्त आले आणि चाहते नाराज झाले. बाबू भैय्याचं पात्र परेश रावल साकारणार नसल्याचं जाहीर होताच चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरलं. परेश रावल यांच्या एक्झिटनंतर त्यांना आता निर्माती कंपनीला कोट्यवधींचा दंड भरावा लागल्याचे वृत्त आहे. यासोबतच अभिनेत्याला त्याचे व्याजही भरावे लागणार आहे.
वर्षानुवर्षे चालणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये होणार मोठा बदल, शो आता १०० दिवस नाही तर ‘इतके’ महिना चालणार
परेश रावल ‘हेरा फेरी ३’ चित्रपटामध्ये नसणार हे आता निश्चित झाले असून त्यांनी स्वतः चित्रपटातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यांनी चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आणि स्वाक्षरीची रक्कम मिळाल्यानंतर परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर, निर्मिती कंपनीने त्यांच्याविरुद्ध २५ कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचे वृत्त आहे. आता, एका नवीन अहवालानुसार परेशने कराराची रक्कम परत केली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, परेश रावल यांना ‘हेरा फेरी ३’ साठी १५ कोटी रुपये देण्यात येणार होते, त्यापैकी ११ लाख रुपये आधीच साइनिंग अमाउंट म्हणून देण्यात आली होती. परेश यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये आणि ते पैसे वापरल्याचे १५ टक्के व्याज यांसह पैसे परेश यांनी परत केल्याचे वृत्त आहे. चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल त्यांनी १५% वार्षिक व्याज आणि काही अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून परत केली आहे. परेश यांच्या करारात चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एका महिन्यानंतर उर्वरित रक्कम, १४.८९ कोटी रुपये मिळतील असे म्हटले होते. याला परेश यांचा आक्षेप होता. हा चित्रपट २०२६ किंवा २०२७ पर्यंत प्रदर्शित होणार नसल्याने परेश यांचे पैसे जवळजवळ दोन वर्षे रखडले असते. ज्यामुळे त्यांनी चित्रपट सोडल्याचं म्हटलं जात आहे.
परेश रावल किंवा त्यांच्या टीमने अद्याप चित्रपट सोडण्याच्या प्रकरणावर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचे कारण दिग्दर्शकासोबत कोणतेही मतभेद नाहीत असं ठामपणे सांगितलं आहे. परेश रावल आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमधील वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला, अशा अनेक अफवांना मध्यंतरी उधाण आलं होतं.