Bigg Boss 19 Will Have Big Changes Show To Run For More Than 5 Months
वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या ‘बिग बॉस’चा लवकरच नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस १९’ बद्दल दररोज नवनवीन अपडेट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा असा एकमेव सर्वात मोठा रिॲलिटी शो आहे की ज्याच्या दररोज माध्यमांमध्ये नवनवीन बातम्या येत आहेत. ‘बिग बॉस १९’चा पहिला प्रोमो जूनच्या अखेरीस शूट केला जाईल. नवीन हंगामाचा प्रीमियर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात असणे अपेक्षित आहे.
यंदाचा ‘बिग बॉस’चा सीझन खूप खास असणार आहे. खरंतर, प्रत्येक सीझन आजवर १०० किंवा १२० दिवसांपर्यंत राहिला आहे. पण यंदाचा ‘बिग बॉस १९’ हा शो सर्वात मोठा म्हणून चालणार आहे. सर्वात मोठा चालणारा हा सीझन तब्बल ५.५ महिने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे. यासंबंधितचं वृत्त पिंकव्हिलाने दिलेले आहे. आतापर्यंतच्या सीझनपेक्षा हा आगामी सीझन खूप खास असणार आहे. तीन महिने चालणाऱ्या शोच्या फॉरमेटमध्ये प्रेक्षकांना हा सीझन जरा हटके पद्धतीने अनुभवता येणार आहे. त्यामुळे शोच्या इतिहासातील सर्वात मोठा सीझन असण्याची शक्यता आहे. सलमान खान शोचं होस्टिंग करणार असून टिव्ही स्क्रिनवर स्पर्धक म्हणून नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.
‘बिग बॉस’चा कोणताही सीझन असो तो सहसा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. पण यंदाचा सीझन मात्र जुलै २०२५ पासून सुरु होण्याची शक्यता आहे. यावर्षी फार लवकरच ह्या शोचं प्रीमियर होणार आहे. यासोबतच, गेल्या काही वर्षांपासून ‘बिग बॉस’चे ओटीटी व्हर्जन आधी स्ट्रीम होत होते; परंतु यावेळी बिग बॉस ओटीटी व्हर्जन असणार नाही. यापूर्वी शोचे शॉर्ट फॉरमॅट डिजिटल व्हर्जन सुमारे दीड महिना जिओ सिनेमावर स्ट्रीम केला जात होता. एप्रिलमध्ये ‘बिग बॉस १९’ रद्द झाल्याची बातमी आली होती आणि शोचे निर्माते बनिजय एशियाने माघार घेतल्याचे बोलले जात होते, ज्यामुळे शोवर परिणाम होऊ शकतो.
पण त्यानंतर बातमी आली की, कलर्स टीव्ही नवीन निर्मात्यांच्या शोधात आहे आणि निर्माते सापडताच, शोवर काम सुरू केले जाईल. ‘बिग बॉस १९’ची निर्मिती एंडेमोलंच करणार आहेत, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ‘बिग बॉस १९’ हा सलमान खानचा होस्ट म्हणून १६ वा सीझन असेल. ‘वीकेंड का वार’ मधील त्याची उपस्थिती नेहमीच शोचे आकर्षण राहिले आहे आणि यावेळीही चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.