घटस्फोटावर ईशा कोप्पिकरचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "मी तयार नव्हते पण त्याने..."
बॉलिवूडची (Bollywood) ‘खल्लास गर्ल’ अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar) गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२३मध्ये तिने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. ईशाने पती टिमी नारंगसोबत घटस्फोट घेत त्यांनी आपलं १४ वर्षांचं नातं आणलं. ईशा आणि टिमीला ९ वर्षांची रिआना नावाची मुलगी आहे. जी सध्या ईशाजवळ राहते. घटस्फोट घेतल्यानंतर वर्षभरानंतर अभिनेत्रीने पतीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याने कोणत्या चुका केल्या ? याबद्दल सांगितलंय. सोबतच ईशा आणि टिमीने का घटस्फोट घेतला ? यावरही भाष्य केलं. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पीकरने दोघांचंही घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं बदललंय यावर भाष्य केलंय. ती म्हणाली, “ज्यावेळी आमचा घटस्फोट झाला, त्यावेळी मी खूप घाबरलेली होती. त्याच दरम्यान माझ्या डोक्यात विचार सुरू होता की, मी पुन्हा दुसऱ्यांदा माझं आयुष्य कसं काय सुरू करणार ? मी पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करेल याचा मी केव्हाच विचारच केला नव्हता. मी आणि रिआना नारंग हाऊसमधून बाहेर पडले. त्या घरात प्रोटेक्टिव्ह वातावरण होतं. रिआना त्या घरात प्रोटेक्टिव्ह वातावरणात लहानाची मोठी झालीये.”
“त्या घरात तिला सर्व सुख सोयी- सुविधा होत्या. आता वेगळं झाल्यानंतर मी तिला तसंच आयुष्य देऊ शकेल का ? याचा मला प्रश्न पडला होता. मी नारंग हाऊसजवळच आमचं घर खरेदी केलं होतं. कारण, जर तिला तिच्या वडिलांना किंवा तिच्या चुलत भावाला केव्हा भेटायचं असेल तर ती भेटू शकते. पण तिला मी घेतलेले घर खूप आवडलं होतं. रिआनासोबत वेळ घालवण्यासाठी टिमी दररोज यायचा. जरीही आम्ही पती पत्नी म्हणून वेगळो झालो असलो तरीही आम्ही आमच्या मुलीचे आई- वडिल म्हणून कायमच एकत्र आहोत, हे सत्य केव्हाच बदलणार नाही. माझ्यासाठी घटस्फोट घेणं सोपं होतं, पण ते माझ्या तत्वात बसत नव्हतं. खरंतर आम्ही दोघंही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झालो.”
“मला काही प्रश्नांची उत्तरं हवी होती, ती मला युनिव्हर्सकडून मिळाली सुद्धा… मी खूप आध्यात्मिक आहे. मला एकत्र राहून सारखं सारखं भांडायला आवडत नाही. जर एखादी गोष्ट तशीच ठेवली तर तिला वास येतो, अगदी पाण्याचंही तसंच आहे. मला वाटतं आपलं आयुष्य वाहत जाण्यासाठी आहे. टिम्मीने जेव्हा घटस्फोट घेणार असं सांगितलं, त्यावेळी मी घटस्फोट देण्यासाठी तयारच नव्हते. तो खूप बेजबाबदारपणे वागला. कारण आपल्या मुलीला हळूहळू समजावं असं मला वाटत होतं. मला त्याच्याशी याविषयी बोलायचं होतं पण त्याआधीच तो जगाला सांगून मोकळा झाला. नंतर त्याला याची जाणीव झाली आणि त्याने माफी मागितली.”