marathi actor sanjay khapre revealed in interview about de dhakka movie soundarya role says
मराठमोळे अभिनेते संजय खापरे गेले कित्येक वर्षे मराठी इंडस्ट्रीचा भाग आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्याने साकारलेली भूमिका चाहत्यांच्या चांगलीच मनामध्ये घर करुन आहे. अभिनेत्याने ‘दे धक्का’ चित्रपटात साकारलेल्या सुंदऱ्याच्या भूमिकेने अभिनेत्याला एका वेगळ्याच उंचीवर प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या भूमिकेने त्याला प्रसिद्धी दिली, तिच भूमिका अभिनेत्यासाठी डोकेदुखी ठरली. त्या भूमिकेबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीच्या माध्यमातून मनातली खदखद व्यक्त करुन दाखवली आहे.
नुकतंच संजय खापरेंनी ‘इट्ट्स मज्जा’ ला मुलाखत दिली. त्यादरम्यान त्यांनी ‘दे धक्का’ चित्रपटात साकारलेल्या ‘गे’च्या भूमिकेविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “मला असं वाटतं आपण केलेलं कोणतंही काम फुकट जात नाही. ते बरोबर लोकांच्या लक्षात राहतं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की, आपण इथे किती रमायचं. टाईपकास्ट व्हायला खूप चान्सेस असतात. आपल्याकडे लोकं हा विनोदी नट आहे, तर लगेच तसा स्टॅम्प मारतात. मला ‘दे धक्का’ नंतर मला त्याच पद्धतीच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण, माझ्यासाठी ती आव्हानात्मक भूमिका होती म्हणून मी ती केली.”
गायक कैलाश खेर यांनी गाण्यातून दिला स्वच्छतेचा नारा, ‘स्वच्छ भारत’ गाणं प्रदर्शित
त्यानंतर पुढे ते म्हणाले, “मला परत त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. तेव्हा माझ्याकडे प्लॅन बी तयार होता. मी डिझायनिंग करत होतो त्याच्यामध्ये मी रमत होतो. सांगायचा मुद्दा एवढाच की, कामाची गरज प्रत्येकाला असते. पण, उगाच काहीतरी करायचं आणि तिथे अडकून पडायचं आणि आयुष्यभरासाठी तो स्टॅम्प लावून घ्यायचं ते मला नको होतं.” असं म्हणत संजय खापरेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. एका क्रेझी कुटुंबाची कथा पाहताना प्रेक्षक बेभान झाले होते. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे आणि गौरी इंगवले असे बरेच कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.