Marathi Actress Gargi Phule Is On Instagram Reel Stars And Industry
सध्याचा सोशल मीडियाचा जमाना आहे. या जमान्यामध्ये कधी आणि कसं कोण व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. ज्या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स किंवा त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज अधिकाधिक असतात, त्याला काही काळाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झळकायला संधी मिळते. यामुळे कलाकारांवर अन्याय होतो किंवा ज्यांना खरंच कामाची गरज आहे, त्या कलाकारांना अभिनयात फार कमी संधी मिळतात. याच मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी परखडपणे भाष्य केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान मराठी इंडस्ट्रीतील सध्याची परिस्थिती सांगितली आहे.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री गार्गी फुलेने सांगितले की, “सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातून कलाकार नाही तर, तर स्टार बाहेर आले आहेत. कलाकार असणं वेगळं आणि स्टार असणं वेगळं. आता आपलं दुर्दैव आहे, सगळ्याच मिडीयम मधलं, जसं की, नाटक असुदे, चित्रपट असुदे किंवा सीरियल असुदे, यासाठी आपण स्टार शोधतो, कलाकार नाही शोधत आणि जर आपण कलाकार शोधला असता तर आपण, आज जे सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स आहेत, त्यांना काम मिळणं बंद झालं असतं. तर मला खूप वाईट वाटतंय. कारण, जेव्हा आम्ही वीस-वीस वर्ष कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतो, प्रशिक्षण घेतो, आम्ही कष्ट करतो, तेव्हा आम्हाला कोणी विचारात नाही.”
“मागून अचानक इंडस्ट्रीमध्ये रिल स्टार येतो किंवा येते आणि तो येऊन तो हिरो होतो किंवा हिरोईन होते, तिला एक उत्तम काम दिलं जातं. ते डिलिव्हर होतं की नाही हा प्रश्न मला पडतो आणि लोकांनाही तेच हवं आहे का? असा प्रश्नही मला पडतो. मालिकेच्या किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का? आणि मग जर तशीच प्रसिद्धी हवी असेल तर चित्रपट चालत नाही, ही सत्यस्थिती आहे. मग असंच होणार ना… जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन उत्तम कथेवर चित्रपट किंवा सीरिअल कराल, तेव्हा ते उत्तम चालेल. पण, तुम्हाला रील्स स्टार पाहिजे आहेत.” असं म्हणत अभिनेत्री गार्गी फुलेने मराठी इंडस्ट्रीबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.