(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला बिग बॉस मराठी सध्या अत्यंत रंजक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. १०० दिवसांच्या या स्पर्धेत ५० दिवस पूर्ण झाले असून घरातील समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत. मराठी आणि हिंदी कलाकारांसोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनीही घरात प्रवेश केल्यामुळे सुरुवातीपासूनच वातावरण तापलेले दिसत आहे.
या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’मध्ये होस्ट रितेश देशमुख यांनी अनेक स्पर्धकांची कानउघाडणी केली. विशेष म्हणजे रविवारी होणारे एलिमिनेशन यावेळी शनिवारीच पार पडले. विदर्भचा रोशन भजनकर याला घराचा निरोप घ्यावा लागला. तो एका टोळीचा भाग असला तरी विशालच्या सांगण्यावरूनच खेळतो, असा आरोप करत घरातील इतर सदस्य त्याला सतत टार्गेट देखील करताना दिसले.
दरम्यान, १ मार्च २०२६ चा ‘बिग बॉस’च्या नवा भागाचा प्रोमो समोर आला असून त्यात घरात तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक एन्ट्री घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन मुली आणि एक मुलगा अशा तीन नव्या सदस्यांच्या आगमनाने घरातील वातावरण पुन्हा एकदा रंगणार असल्याचे समजले आहे. यातील एक नाव समोर आले असून संकेत पाठक हा लोकप्रिय अभिनेता वाइल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश करणार आहे. त्याने छत्रीवाली आणि लग्नाची बेडी या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तो ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातही झळकला होता.
दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून संस्कृती साळुंखे हिचे नाव चर्चेत आहे. ती जाऊ बाई गावात या शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. तसेच रेवा कौरसे ही अभिनेत्री देखील तिसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे समजले आहे. आता या नव्या स्पर्धकांच्या एन्ट्रीनंतर घरातील ग्रुपबाजी, मैत्री आणि रणनीतींमध्ये नेमके कोणते बदल होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी भागांमध्ये नवे वाद, नवी समीकरणे आणि तगडी टक्कर पाहायला मिळणार, हे नक्कीच आहे.






