(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेता पुष्कर जोग हा आपल्या थेट आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे तसेच सोशल मीडियावर सक्रिय उपस्थितीमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याच्या बोलण्याची आणि पोस्ट्सची चर्चा नेहमीच रंगताना दिसते.
आता पुन्हा एकदा पुष्कर जोग आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे. त्याने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये त्याने #जोगबोलणार हा हॅशटॅग वापरत काही अर्थपूर्ण ओळी लिहिल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय बोलणार आणि कोणत्या विषयावर त्याने भाष्य केलंय, याबाबत नेटिझन्समध्ये उत्सुकता वाढली आहे.
पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ”गोड गोड बोलून, काही लोक स्वत:चं काम काढून घेतात. हा कदाचित हलकटपणा असेल. पण, हे माहीत असूनही त्यांच्यासाठी ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे.”
त्याने पुढे लिहिले, “काय करणार? स्वभावाला औषध नाही. चांगुलपणा नडतो; पण आता नाही…” याचबरोबर त्याने ‘जोग बोलणार’ असा हॅशटॅगही वापरला आहे.
असा मेसेज नेमका कोणाबद्दल किंवा कोणत्या प्रसंगावरून लिहिला आहे, याबद्दल पुष्करने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे तो पुढे नेमके काय बोलणार आणि या सूचक पोस्टच्या मागील कारण काय आहे, याविषयी आता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पुष्कर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याच्या खासगी आयुष्यातील, तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याला अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे ट्रोल केले जाते, आणि त्याला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पुष्कर नेहमी त्याची मते खुलेपणाने मांडताना दिसतो.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पुष्कर जोगने बालकलाकार म्हणूनही काम करत आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनों’ या बॉलिवूड चित्रपटात तो बालकलाकार म्हणून झळकला होता. त्यानंतर १९९६ मधील ‘ऐसी भी क्या जल्दी है’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली.
मराठीत त्याने २००७ साली आलेल्या ‘जबरदस्त’ या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनयाबरोबरच पुष्कर जोग त्याच्या नृत्यासाठी देखील विशेष ओळखला जातो. विविध कार्यक्रमांत त्याने सादर केलेल्या डान्स परफॉर्मन्सला नेहमीच प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.






