(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुबाबदार आणि स्टायलिश लव्हस्टोरीतील पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!
‘कसं तरी होतंया रं’ या गाण्यात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या पहिल्या प्रेमातील निरागस, हळवे आणि गोड क्षण अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. प्रेमात पडल्यावर मनात निर्माण होणारी धडधड, नजरानजरेतून उमटणारी ओढ, हळूच उमलणारे भाव या सर्व भावना या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत.
या रोमँटिक गाण्याला बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाची जादू लाभली आहे. या गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे यांच्या शब्दांनी गाण्याला अधिक भावनिक खोली दिली आहे. तर चिनार–महेश यांच्या संगीतामुळे हे गाणं ऐकताना प्रेमाच्या विश्वात लोक नक्की हरवून जातील. चिनार-महेश यांनी ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘धर्मवीर’सारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले होते. आता ‘रुबाब’च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी कमाल अल्बम घेऊन आले असून प्रेक्षकांना त्यांच्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे.
हा चित्रपट आणि गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले, “‘रुबाब’ हा आजच्या पिढीच्या प्रेमकथेचा ठाम आवाज आहे. या गाण्यातून या रुबाबदार लव्हस्टोरीची भावनिक सुरुवात होते. पहिल्या प्रेमातील गोंधळ, उत्सुकता आणि ओढ या सगळ्या भावना आम्ही प्रामाणिकपणे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.” झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.






