अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर
ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी “तुला पाहता” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे, आनंद काळे, दीपाली विचारे, मानसी पाटील, नचिकेत लेले, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे आणि आकाश शिंदे अशी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?
भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, अशा कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण जोडपं स्वतःची ओळख, नातेसंबंध, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा अनेक भावनिक, सामाजिक आणि वैचारिक स्तरांवर संघर्ष उभे राहतात. ‘तुला पाहता’ ही याच पार्श्वभूमीवर आधारित एक रंजक, संवेदनशील आणि समकालीन कथा आहे. या कथेत तीन पिढ्या एकत्र दिसतात आणि त्यांच्या नात्यांमधील गाठी न ताणता, त्या कशा अलगद सोडवल्या जाऊ शकतात, याचा सुंदर प्रवास या चित्रपटातून उलगडतो.
चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या, “हा चित्रपट अत्यंत समकालीन आणि काळाला अनुरूप आहे. पिढ्यांमधली वीण कुठेही गाठ न बसता, सगळ्या गाठी कशा सोडवल्या जातात, ही या कथेची फार सुंदर बाजू आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडली. मयुरा हिचा मी या चित्रपटात असावं हा आग्रह होता आणि तो मला मोडता आला नाही. इतक्या वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपट करताना एखादी भूमिका पूर्णपणे माझी असावी असा आग्रह असू शकला असता, पण मयुराने ज्या पद्धतीने कथा सांगितली आणि भूमिका समजावली, त्यामुळे मी लगेच या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. एका चांगल्या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.”
चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘तुला पाहता’ या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. एक वेगळा विषय, समृद्ध अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच विशेष स्थान निर्माण करेल.






