Akshay Bardapurkar (Photo Credit - File)
मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका महत्त्वपूर्ण आदेशात मुलुंड पोलिसांना त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानंतर अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
‘प्लॅनेट मराठी’ च्या माजी भागीदार सौम्या विलेकर (Saumya Vilekar) यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर (क्रमांक ४१७०/२०२५) सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. सौम्या विलेकर यांनी आरोप केला आहे की, ३ ऑक्टोबर २०२३ रोजी एका बनावट ‘रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप डीड’ तयार करण्यात आला. या बनावट करारावर सौम्या यांचा फोटो आणि खोट्या स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्या.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे, आरोपींनी विविध बँकांकडून (जसे की अॅक्सिस बँक, डॉइचे बँक) कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. याच कागदपत्रांचा वापर बौद्धिक संपत्तीशी संबंधित मोठे व्यवहार करण्यासाठीही करण्यात आला.
सौम्या विलेकर यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व व्यवहार त्यांच्या परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय झाले. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनीशी संबंध तोडण्यासाठी १५ जानेवारी २०२४ रोजी ‘डीड ऑफ अॅडमिशन-कम-रिटायरमेंट’ हा एकमेव कायदेशीर दस्तऐवज त्यांनी तयार केला होता.
सुनियोजित फसवणूक आणि न्यायालयाचा हस्तक्षेप
सौम्या यांनी स्थानिक पोलिसांकडे अनेक पुरावे दिले, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागली. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत सौम्या विलेकर म्हणाल्या, “हे केवळ बनावट कागदपत्रांचे प्रकरण नाही, तर माझ्या ओळखीचा गैरवापर करून केलेली एक सुनियोजित फसवणूक आहे.” या प्रकरणात अक्षय बर्दापूरकर, त्यांची सहकारी मीनाली दीक्षित आणि नोटरी दौलत आहिर यांना आरोपी ठरवण्यात आले आहे.
‘प्लॅनेट मराठी’ चे कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. कंपनीचे अॅप काम करत नाहीये आणि बहुतांश कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या कंपनीविरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल मध्ये ‘लिक्विडेशन’ (कंपनीची मालमत्ता विकून कर्ज फेडण्याची) प्रक्रिया सुरू आहे. अक्षय बर्दापूरकर यांच्यावर मुंबई, पुणे आणि इतर अनेक ठिकाणी आर्थिक आणि फौजदारी गुन्ह्यांचे खटले प्रलंबित आहेत. हे प्रकरण ‘प्लॅनेट मराठी’ आणि अक्षय बर्दापूरकर यांच्या पुढील वाटचालीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.