अभिनेत्री सानिका काशीकरची खास मुलाखत
‘शुभ श्रावणी’ ही मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे आणि या मालिकेची स्टारकास्ट अत्यंत तगडी आहे. बऱ्याच वर्षांनी लोकेश गुप्ते, आसावरी जोशी अशी नावं या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. वल्लरी विराजसह सानिका काशीकर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांना दिसत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतही दोघी एकमेकींच्या विरोधात काम करत होत्या आणि पुन्हा एकदा ‘मोक्षा’ ही भूमिका सानिका वल्लरीच्या ‘श्रावणी’ या भूमिकेविरोधात साकारत आहे.
याच निमित्ताने सानिकाशी नवराष्ट्रने खास गप्पा मारल्या आहेत आणि तिला या नव्या मालिकेतील भूमिकेबाबत काय वाटतं आहे? पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना तोचतोचपणा येणार नाही ना असं वाटतंय का? अशा सर्व प्रश्नांची अगदी मनसोक्त उत्तरं दिली आहेत.
‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा
‘शुभ श्रावणी’तील मोक्षाबद्दल सांग ना?
सानिका उत्साहात म्हणाली, ‘एका टिपिकल राजकारणी घराण्यात लाडात वाढलेली आहे मोक्षा आणि हीच भूमिका मी साकारत आहे. घरात जे काही चालू आहे तिची आई जे काही करत आहे तेच योग्य आहे अशा वातावरणात वाढलेली आणि अत्यंत पैशाचा गर्व असणारी आणि आपणच जगात सर्वात सुंदर आहोत असं समजणारी मोक्षा प्रचंड लाडावलेली आहे’, यानंतर सानिकाने सांगितलं की, ‘मोक्षासाठी तिची आई म्हणेल तेच योग्य आहे. लहानपणापासून ती जे पाहत आली आहे, तेच तिला योग्य वाटतंय, त्यामुळे अशी मोक्षा मी साकरत आहे आणि ही भूमिका करताना मजा येतेय’
पुन्हा एकदा वल्लरीच्या विरोधात काम करते आहेस तर Repetition ची भीती नाही का वाटली?
सानिका म्हणाली, ‘खरं तर मला जेव्हा या भूमिकेबाबत सांगण्यात आलं तेव्हा थोडी भीती वाटली होती. लक्ष्मी किंवा सानिका या व्यक्तिरेखेतून नको दिसायला असंं वाटलं. आपल्याला या भूमिकेतून मोक्षा कशी वेगळी करता येईल याचा विचार केला. मुळात TV वर काम करताना तुमच्या काही चुका झाल्या ना तर त्या सुधारायला संधी असते आणि त्यामुळे मोक्षाची भूमिका वेगळी कशी दिसेल यासाठी मी नैसर्गिक पद्धतीने जसा अभिनय करता येईल तो करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरी नकारात्मक भूमिका असेल, तरीही त्यातील वेगळेपणा प्रेक्षकांना नक्कीच दिसणार आहे.’
लोकेश गुप्ते, आसावरी जोशी या दिग्गज कलाकारांसह काम करताना दडपण आलंय का?
यावर सानिकाने सांगितले की, ‘कास्टिंग झालं तेव्हाच मला दडपण आलं होतं. कारण नाटकात मी जी भूमिका करत होते ती आधी आसावरी ताईंनी केली होती. पण खरं सांगू का? आसावरी ताईंना भेटल्यावर माझं दडपण एकदम गायब झालं. भूमिका करताना त्याचे तपशील किती महत्त्वाचे असतात आणि कशा पद्धतीने भूमिकेचा खोलवर जाऊन अभ्यास करायचा हे मी आसावरी ताईंना पाहून शिकतेय. अगदी बारीकसारीक गोष्टीही कधीकधी लक्षात येत नाहीत पण त्या पटकन समजावून सांगतात, त्यांची निरीक्षणशक्ती कमाल आहे. लोकेश दादांबरोबरही काम करताना मजा येत आहे. खूपच मस्त वाटतंय. आता भूमिकेचं आणि सहकलाकारांचं दोघांचंही दडपण अजिबातच नाही.
झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!
भूमिका निवडताना काय विचार करतेस?
यावर सानिका म्हणाली की, ‘नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती अभिनय करताना जपावीही लागते. ही तिन्ही माध्यमं वेगळी आहेत. यातील अभिनय तिन्ही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करावा लागतो आणि त्याचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी Acting Meter वेगळा असतो आणि ते जपता आलं पाहिजे का विचार भूमिका निवडताना आणि साकारताना करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रत्येक ठिकाणी वेगळी मेहनत आहे हे मात्र नक्की’
सानिका सध्या मोक्षा ही भूमिका साकरत असून लवकरच तिचा चित्रपटही येणार आहे. ती नुकतीच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून आली आहे. मात्र याबाबत अधिक तपशील तिने दिलेले नाहीत, त्यासाठी तिच्या चाहत्यांना नक्कीच वाट पहावी लागणार आहे.






