(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आगामी ‘रेड २’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि वाणी कपूर यांच्याही मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘रेड २’ १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि संपूर्ण टीम त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता या हल्ल्याबद्दल नेमकं काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
पहलगाम हल्ल्यावर संतापला रितेश
अलिकडेच, जेव्हा रितेश देशमुखला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यामध्ये २६ पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर लक्ष्य करून मारण्यात आले होते, तेव्हा अभिनेत्याने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. फिल्मीग्यानशी बोलताना तो म्हणाला की, “हे खूप दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. अचानक दहशतवादी येतात आणि गोळीबार सुरू करतात. हा केवळ त्या कुटुंबांसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ला आपल्या समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे.” असं अभिनेता या मुलाखतीत म्हणाला.
Justin Bieber च्या जवळच्या व्यक्तीचे निधन, गायकाने पोस्टद्वारे व्यक्त केली भावना!
“काश्मीर आपलं आहे” – रितेश देशमुख
तसेच, पुढे अभिनेता म्हणाला की, “मला पूर्ण विश्वास आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या प्रकरणात कठोर पावले उचलत आहे. कोणताही शेजारी देश आपल्याला हुकूम देऊ शकत नाही. आपण एकत्र येऊन काश्मीर हा भारताचा भाग आहे हे सांगायला हवे.” असं अभिनेता म्हणाला आहे. अभिनेता रितेश देशमुख अनेकदा गंभीर विषयावर आपले मत मांडताना दिसला आहे. तसेच आता पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना त्याचे स्पष्ट विचार पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
पहलगाममध्ये नेमकं काय घडले?
पहलगामच्या बैसरन व्हॅलीला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्या पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शिक्षा करण्याचा संकल्प केला आहे. सगळ्या भारतीयांचे लक्ष या प्रकरणावर अडकून राहिले आहे सगळेच या निर्दोषी पर्यटकांना न्याय मिळायला हवा अशी प्रार्थना करत आहेत.
‘रेड २’ कडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ‘रेड २’ मध्ये रितेश देशमुख एका धक्कादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणसोबतचा त्याचा संघर्ष प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे. ‘रेड’ चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि आता चाहत्यांना ‘रेड २’ कडूनही खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट येत्या १ मे ला संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.