(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांचा ऐतिहासिक समावेश झाल्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीकडे जागतिक स्तरावर सर्वदूर अभिमानाने आणि औत्सुक्याने पाहिले जात आहे. रायगड, विजयदुर्ग, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, जिंजी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बारा दुर्ग ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ या संकल्पने अंतर्गत युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कालातीत मूल्ये भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दि. ७ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान प्रभादेवी, मुंबई येथे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई “शिवसंस्कार महोत्सव २०२५” आयोजित करत आहे. हा महोत्सव इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचा सुंदर संगम ठरेल.
अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग
शिवसंस्कार महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण म्हणून नव्हे, तर आजच्या नागरिकांसाठी, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकता या मूल्यांची आठवण करून देणारा एक जिवंत अनुभव असेल. सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई गेली १५ वर्ष हा अनमोल वारसा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे.
लेखक, गीतकार आणि या उपक्रमाचे सर्वेसर्वा श्री. अनिल नलावडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन केवळ लढवय्या आणि विजयांपुरते मर्यादित नाही, त्यात दूरदृष्टी, नीतिमत्ता, नेतृत्वाचे आणि राष्ट्राप्रती आपल्या कर्तव्याचे अमूल्य धडे आहेत. शिवसंस्कार महोत्सवाद्वारे आम्हाला ही मूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचवायची आहेत, जेणेकरून ते एक मजबूत आणि एकसंघ भारत घडविण्यास मोलाची भूमिका बजावतील.”
गौहर खान आणि झैद दरबारच्या घरी आले गोंडस बाळ, सोशल मीडियावर दिली खुषखबर!
कार्यक्रम संचालक, दिग्दर्शक आणि निवेदक पद्मश्री राव म्हणाल्या, “हा महोत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांना पुन्हा नव्याने जाणून घेण्याची संधी – फक्त एक शूर योद्धा म्हणून नव्हे, तर दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि नैतिक शक्तीचा आधारस्तंभ म्हणूनही. कविता, गाणी आणि संवाद यांच्या माध्यमातून आम्ही इतिहास आणि आजचा काळ यांच्यातला संबंध अजून जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”
महोत्सवाचा समारोप १४ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या संगीतमय ऐतिहासिक कार्यक्रमाने होईल. ४३ नवीन रचनांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन सादर करणाऱ्या या पुरस्कारविजेत्या संगीतमय कार्यक्रमात नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, अनिल नलावडे आणि पद्मश्री राव सहभागी होतील. हा कार्यक्रम फक्त सशुल्क रू. १५०/- इतका असेल. याची तिकिटे बुकमायशो वर उपलब्ध आहेत. बाकी सर्व उपक्रम विनामूल्य आहेत. हा महोत्सव फक्त कार्यक्रमांची मालिका नाही, तर विचार जागवणारा, प्रेरणा देणारा आणि समाजमनाला घडवणारा शिवसंस्कार आहे.