(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देत आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या राहिल्या असून, भारतीय संत परंपरा ही समाजव्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ मानली जाते. संतांचे खरे कार्य त्यांच्या जीवनकथांपेक्षा त्यांच्या साहित्यामधून अधिक प्रभावीपणे उलगडते, असे अभ्यासकांचे मत आहे.
तरीही आजही अनेक संतांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाहीत. अशाच थोर संतांपैकी एक म्हणजे ‘संत तुकाविप्र’ महाराज. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील हे महान सत्पुरुष होते. त्यांच्या अभंगांमधून भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग असल्याचा संदेश मिळतो.
वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवत त्यांनी अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधन यांचा समन्वय साधला. त्यांच्या विचारांमधून समाजाला नैतिकता, साधेपणा आणि आध्यात्मिकतेची दिशा मिळते. संत तुकाविप्र महाराजांचे कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापकपणे होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे संतसाहित्य हे अमूल्य सांस्कृतिक संचित आहे. मात्र ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य आजही व्यापक स्तरावर पोहोचलेले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून ‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार या प्रकल्पातंर्गत त्यांच्या अभंगांची चित्रफीत आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘संत तुकाविप्र’ यांच्या जीवनकार्यावर आधारित मोबाईल अॅपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समृद्ध साहित्य संपदेचा ठेवा लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे ‘संत तुकाविप्र’ संस्थान अंजनवती यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.
‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार प्रकल्पाद्वारे त्यांच्या अभंगांना आधुनिक माध्यमांची जोड देत प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रफीत आणि माहितीपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार घडवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
‘संत तुकाविप्र महाराजांचे अभंग मराठीतील दिग्गज गायक आनंद भाटे आणि ऋषिकेश रानडे यांच्या सुरांनी सजले असून, संगीतकार कमलेश भडकमकर यांनी त्यांना उत्कृष्ट संगीतसाज दिला आहे. या अभंगांची सादरीकरणे अत्यंत भावपूर्ण आणि प्रभावी ठरली आहेत.
या वेळी उपस्थित मान्यवरांनीही ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य समाजापर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी पुढाकार घेऊन या विचारांचा प्रसार करावा, असे मत मांडण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले होते. कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करणारे प्रकाश महाराज बोधले यांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ संस्थान, पैठण येथील ह. भ. प. विनीत महाराज गोसावी उपस्थित होते. ते संत एकनाथ महाराजांच्या परंपरेतील चौदावे वंशज असून, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या कार्याशी त्यांचा आध्यात्मिक आणि परंपरागत संबंध अधोरेखित होतो.
या उपक्रमातून ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे अभंग साहित्य, भक्तिमार्ग आणि समाजप्रबोधनात्मक विचार अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच, संत परंपरेचा विचार आणि वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
‘WDITogether’मध्ये जॅकलीनची एंट्री; महिलांना मिळणार जागतिक व्यासपीठ; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत






