(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
सन मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तू अनोळखी तरी सोबती’मध्ये मासिक पाळी या अत्यंत संवेदनशील आणि समाजात अनेकदा न बोलल्या जाणाऱ्या विषयावर अतिशय सुंदर आणि जाणीवपूर्वक प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडील भागात या विषयाची सामाजिक जाणीव ठेवत प्रभावी मांडणी करण्यात आली असून, प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.या भागात मुख्य पात्र अर्पिता मासिक पाळीच्या काळातही घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना दाखवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तिचा नवरा समीर तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तो घरकामात हातभार लावतो, तिच्यासाठी जेवण तयार करून देतो आणि तिची मनापासून काळजी घेत तिचा भावनिक आधार बनतो.समाजात आजही अनेक ठिकाणी टाळला जाणारा हा विषय मालिकेत सन्मानपूर्वक आणि वास्तवदर्शी पद्धतीने हाताळल्यामुळे प्रेक्षकांमध्ये जागरूकता वाढत असून, या एपिसोडची विशेष चर्चा होत आहे.
समीरच्या या वागणुकीमुळे त्याची आई नीलांबरी आश्चर्यचकित होते आणि त्याच्या वर्तनात काहीतरी फरक आहे का, असा प्रश्न तिच्या मनात निर्माण होतो. मात्र, समीरचे हे वर्तन केवळ कर्तव्य म्हणून नसून समज, सन्मान आणि सहजीवनातील समानतेचा संदेश देणारे आहे. या कथानकातून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना समजून घेत, विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये संवेदनशीलता दाखवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!
मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गर्भाशयाची अस्तराची पातळी दर महिन्याला बाहेर पडते. या काळात शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती, स्वच्छता आणि भावनिक आधार अत्यंत गरजेचा असतो. सन मराठी वरिल ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेद्वारे मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर करत, त्याकडे सकारात्मक आणि समजूतदार दृष्टीकोनातून पाहण्याचा संदेश दिला जात आहे.






