(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे . सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर निर्माण झालेलं कुतूहल या ट्रेलरने आणखीनच वाढवलं आहे. तसेच या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षक एका गूढ आणि विलक्षण जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि गूढ हवेलीच्या वातावरणात घडणारी ही कथा भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या संगमातून आकार घेत असल्याचे दिसते आहे. हवेलीतील अघटित घटना, शांततेत दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या मनात दडलेलं रहस्य हे सगळं ट्रेलरच्या दृश्यरचनेतून काहीतरी असामान्य घडणार असल्याची जाणीव देते.
मुक्ता बर्वेच्या नजरेतील भीती आणि प्रश्न, प्रिया बापटचे गूढ वर्तन, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांचा या सगळ्याशी असलेला संबंध हे सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे असणार आहे. प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि ते उलगडताना संपूर्ण चित्र बदलतंय, असा एक विलक्षण अनुभव हा ट्रेलर देतो आहे.
धर्मेंद्रच्या लेकीनंतर आता स्वतः पत्नी हेमा मालिनीने दिले हेल्थ अपडेट, मीडियाला केली कळकळीची विनंती
दिग्दर्शक सचित पाटील आणि अभिनेता म्हणाला, “या ट्रेलरमधून प्रेक्षकांना ‘असंभव’ची अनोखी झलक पाहायला मिळते आहे. पुनर्जन्म ही संकल्पना मराठी चित्रपटात क्वचितच साकारण्यात आली आहे. रहस्य, थरार, भावना आणि वास्तव यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल. प्रत्येक पात्राचं जग उलगडताना, प्रेक्षक त्यांच्या भावनांशी एकरूप होतील.’’
निर्माते नितीन वैद्य या चित्रपटाबद्दल म्हणाले, ‘असंभव’ हा एक रहस्यपट आहेच, सोबतच तो भावनांचा आणि नात्यांचाही अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही केवळ कथा सांगायचा प्रयत्न केला नाही, तर प्रत्येक क्षण अनुभवता यावा यावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणूनच यातील रहस्य, भावना आणि नात्यांचा गुंता या चित्रपटाला वेगळेपणा देतो.”
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.






