छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं तिसरा सीझन सुरु झाला आहे. झी मराठीवरील (Zee Marathi) या शोच्या नव्या सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबतच राजकीय नेतेही हजेरी लावत आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या नवीन भागात आता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane In Khupte Tithe Gupte) सहभागी होणार आहेत.
नारायण राणेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं. नारायण राणेंना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, “आमदार उचलून आणणे, सरकार पाडणे…त्यावेळी तुमची मास्टरकी झाली होती. आता हेच त्यांच्याबरोबर घडलं. जर तुम्ही आज शिवसेनेत असता तर काय केलं असतं?”
अवधूत गुप्तेने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, “आम्ही सगळे जाण्याची परिस्थिती यांनीच आणली. मी शिवसेनेत असतो तर सेनेची ही अवस्था कधी झालीच नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता, चाळीस तर सोडाच.”
‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अवधूत गुप्ते खुमासदार शैलीत प्रश्न विचारत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यावेळीही भूतकाळात झालेल्या अनेक गोष्टींवर या दिग्गजांनी दिलखुलास भाष्य केलं. सध्या झी मराठीने सोशल मीडियावर नारायण राणे सहभागी होत असलेल्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 जून, रोजी रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाणार आहे.