शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं अलीकडेच रसिकांच्या भेटीला आलं असून, त्याने प्रेक्षकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला आहे. प्रेम, नाते-संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणाऱ्या या चित्रपटात, हे गाणं प्रेमभावनेचा नाजूक आणि गोड अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवतं. प्रेम ही भावना शब्दांइतकीच सूरांतूनही व्यक्त करता येते, हे या गाण्यातून नेमकं दाखवण्यात आलं आहे.
“आभाळ रातीला” हे गाणं केवळ एक रोमँटिक गीत नसून, ते मराठी संस्कृतीचा ठेवा आणि पारंपरिक मूल्यांचा गौरव करणारा एक अभिव्यक्तीमधला सोहळा आहे. ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर पारंपरिक मराठी पोशाखात नाचणारी तरुणाई, मुख्य कलाकारांचं सादरीकरण आणि देवीची मंगल स्तुती, या सगळ्याचा संगम प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतो.
गाण्याचं चित्रीकरण भव्य आणि देखणं आहे. मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक, सजीव लेझीम नृत्य यांचा समावेश करून हे गाणं एक सणासारखा अनुभव देतं. हे गाणं मनोरंजन तर आहेच, पण त्याहूनही अधिक ते मराठी संस्कृतीप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम यांचं दर्शन घडवतं. प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते आणि म्हणूनच हे गाणं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.
गाण्याला सुहास मुंडे यांनी शब्दबद्ध केलं आहे, तर संगीतकार ओंकारस्वरूप यांच्या संगीताने त्याला जिवंत केलं आहे. गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार यांच्या दमदार आवाजाने गाण्याला वेगळंच उंचीवर नेलं आहे. सजना चित्रपट २३ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा असून, त्यांनी चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सर्व स्वतः केलं आहे. “आभाळ रातीला” या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अगदी शिघेला पोहचली आहे.