Punyashlok Ahilyabai Holkar 300th birth anniversary cultural program organized on the occasion
पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, अहिल्याबाईंच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा संगम साकारण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश अहिल्याबाईंच्या सामाजिक, प्रशासनिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करत नव्या पिढीपुढे त्यांचे आदर्श नेतृत्व प्रभावीपणे सादर करणे हा होता. कार्यक्रमास सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज, अभ्यासक, कलाकार आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व क्युरेशन संगीत नाट्य अकादमीच्या डॉ. संध्या पुरेचा यांनी केली असून, यामध्ये विवेक आपटे व सुभाष सैगल यांच्या संहितेला अजीत परब यांचे संगीत लाभले. सुभाष नकाशे यांचे नृत्यदिग्दर्शन आणि हरिश भिमानी यांचे प्रभावी निवेदन कार्यक्रमाला सुसंवादी आकार देत होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे नेतृत्व, न्याय आणि संस्कृती यांचा मूर्तिमंत आदर्श. आजचा कार्यक्रम ही त्यांच्या जीवनकार्याची एक जिवंत आठवण होती. पुढच्या पिढ्यांनी अहिल्याबाईंच्या कार्याची ओळख केवळ पाठ्यपुस्तकांतून नव्हे, तर अशा सांस्कृतिक सादरीकरणांमधून घ्यायला हवी. हीच खरी आदर्श नायिकेची ओळख आहे. डॉ. संध्या पुरेचा यांनी यावेळी असे सांगितले.
खरंच! छोटा पुढारीचं निधन? बिग बॉस अभिनेत्याचा हार घातलेले फोटो व्हायरल
सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या भावना शहा म्हणाल्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच जीवनकार्य हे केवळ आदर्श स्त्री नेतृत्वाचं प्रतिक नाही, तर सामाजिक न्याय, मूल्यनिष्ठा आणि माणुसकीचे मूर्त स्वरूप आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या समाजाला दिशा मिळते. अशा कार्यातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळणं हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे.” कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान दिल्याबदल सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग इस्न्टिट्यूटच्या विश्वस्तांचे त्यांनी आभार देखील मानले.
सर्वात विशेष ठरले ते म्हणजे अहिल्याबाईंच्या नेतृत्वगुणांचे नाट्यात्मक सादरीकरण, ज्यात त्यांनी प्रशासन, मंदिर उभारणी, सामाजिक न्याय, विधवांचे पुनर्वसन आणि स्त्रीसक्षमीकरण यामध्ये दिलेल्या योगदानाचे सादरीकरण प्रभावीपणे झाले. कार्यक्रमानंतरही अनेक प्रेक्षक सभागृहातच थांबून कलाकारांच्या अभिनयाने भारावून गेले होते. हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक प्रवास ठरला, ज्याची चर्चा सांस्कृतिक वर्तुळात अनेक दिवस रंगणार हे निश्चित!