bigg boss marathi 5 actor ghanshyam darode refutes death rumors in viral video
‘बिग बॉस मराठी ५’ फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडेबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या निधनाचे वृत्त तुफान व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया युजर्सकडून त्याच्या निधनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक युजर्स ‘छोटा पुढारी’ उर्फ घन:श्याम दरोडेचे निधन झाल्याचे म्हणत होते. घनश्यामच्या फोटोला हार घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता या सर्व अफवा असल्याचे स्वत: घन:श्यामने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर थेट एक व्हिडीओ शेअर केला आहे.
घन:श्यामने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घन:श्याम बोलताना दिसतोय की, “नमस्कार मित्रांनो, सर्वांचे खूप धन्यवाद. व्हिडीओ बनवण्याचे कारण एकच आहे की, आजपर्यंत कमेंट सेक्शन पाहात आलो. कोणी मला ट्रोल केले. वाईट साईट बोललं. कोणी पॉझिटिव्ह बोलायचे. पण आज कळालं की माणूस गेल्याच्या नंतर माणसं त्याच्या मागे किती चांगलं बोलतात. भलेही तो माणूस जिवंत असो वा नसो. मला एकच सांगयचं आहे की तुमची कायम साथ आहे म्हणून हा घन:श्याम दरोडे खंभीरपणे लढला आहे आणि पुढेही लढत राहिल.”
व्हिडिओमध्ये घन:श्याम पुढे म्हणाला की, “कोणत्या तरी एका दादाने त्याच्या अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. बिग बॉस फेम घन:श्याम यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो. तुमच्या घन:श्यामला काहीच झालेले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहिली तर त्याचे आयुष्य वाढते. पण मला त्या दादाला एकच सांगायचे आहे की माझ्या बाबतीत केलं इतर कुणाच्या बाबतीत करु नको. तुम्हाला सर्वांना देखील विनंती करतो काळजी करु नका, मला फोन करु नका, प्रेमाने करताय पण काळजी करुन फोन करु नका, टेन्शन घेऊ नका, मला काहीही झालेले नाही. मी धडधाकट आहे. मी बोलतोय चालतोय एकदम व्यवस्थित आहे. माझा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. आता मी ठिक आहे. काळजी करु नका. ती अफवा खोटी आहे. ती पोस्ट खरी नाही.”
अखेर रणदीप हुड्डाचे स्वप्न झाले पूर्ण; अभिनेत्याने खरेदी केले आलिशान घर, किंमत जाणून व्हाल चकीत
घन:श्यामने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या फोटोला हार घातलेला एक पोस्टर पाहायला मिळत आहे. त्या पोस्टरवर ‘पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्याला पुढाऱ्यांनी शोधून काढत वाहिली आदरांजली’ असं कॅप्शन लिहिण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करत घन:श्यामने, ‘मला श्रद्धांजली वाहणाऱ्याला शोधुन काढले’असं लिहिलेय. सध्या सोशल मीडियावर घन:श्यामचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडेने या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दोन सोशल मीडिया चॅनेलवरून त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप त्याने तक्रारीमध्ये केला आहे.