"माझं नाव, परिचय सांगितला आणि..." प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक...
मराठी सिनेसृष्टीत दिग्गज खलनायकांपैकी एक प्रसिद्ध राहिलेले राजशेखर आज चर्चेत आले आहेत. त्यांच्या नातवाने त्यांच्यासाठी खास एक सुंदर पत्र लिहिलं आहे. राज राजशेखर याने आपल्या आजोबांना लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज राजशेखरने आपल्या आजोबांच्या जयंतीनिमित्ताने हे भावुक पत्र लिहिलं आहे.
राजने आपल्या आजोबांबरोबरचे फोटो एकत्र करून शेअर करत एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राजने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजने पत्रात लिहिलंय की, “प्रिय आजोबा पत्र लिहिण्यास कारण की, साधारणपणे २०१२ मधील पुण्यातली ही गोष्ट आहे. माझी नुकतीच दहावी झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालयातचं शिकण्याचा माझा हट्ट होता, त्या दृष्टीने प्रयत्न करून दाखला देखील मिळवला आणि उगवला माझ्या कॉलेजचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी वर्गात विद्यार्थी परिचय. बाकीच्या मुलांचा इंट्रो झाला, मग मी पुढे आलो. माझं नाव सांगितलं आणि माझ्याबद्दलचा परिचय दिला. तोच एका-एक माझ्या अवती-भवती लोकांचा गराडा जमला.”
“जणू मी कोणीतरी मोठा स्टार आहे आणि या अनोळखी शहरात एका क्षणात ओळखीची अशी कैक नाती निर्माण झाली. बरं आज हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे, तुम्ही परलोकात राहून मी परगावी असताना दिलेला हा मला आशीर्वाद होता. कारण तो जमलेला गराडा हा ‘राज’ नंतरच्या ‘राजशेखर’ मुळे होता. आणि हे मान्य करण्यात मला सार्थ अभिमान आहे. त्या अनोळखी शहरात तुमच्यामुळे नाती जोडणं सोप्पं झालं आणि बाबांच्या संस्कारांमुळे ते टिकवणं मला जमलं. आजोबा तुम्ही जरा लवकरच गेलात नं… हो ठाऊक आहे मला शरीर रूपानेचं गेला आहात… पण तरी! आजोबा… खूप जगायचं होत हो तुमच्या सोबत… आयुष्यातील सर्व कांड सांगायचे होते… क्राफ्ट सुधारण्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न विचारायचे होते.. तुमचं सिनेमा बद्दलचं म्हणनं जाणून घ्यायचं होतं…”
“तुमच्या नजरेतून तुमचे गुरु ‘भालजी पेंढारकर’ अनुभवायचे होते. मी लिहिलेल्या कथा वाचून दाखवायच्या होत्या, तुमच्या सोबत मैफिलीत बसून माझ्या कविता ऐकवायच्या होत्या! हो मला ठाऊक आहे तुम्ही वरून हे सर्व काही पाहत आहात. मी कुठे अडकलो तर तुम्हीच जादूची कांडी फिरवता आणि माझ्या सर्व अडचणी दूर करता. सगळं- सगळं ठाऊक आहे मला… पण तरी ! हे ‘तरी’ आहे नं तेच बोचतं खूप! पण तुम्ही देखील पक्के हुशार होतात हं! ‘बाबांच्या नजरेतून’ माझ्याशी बोलता, ‘राहूल चाचुच्या देहबोलीतून’ आजूबाजूला दिसता, आणि ‘आज्जीच्या मिठीत मायेची उब’ बनून तुम्हीच असता… तुम्ही पण काही कमी नाही. नातवाची आठवण झाली की तुमच्या उर्जेची जाणीव या नं त्या मार्गाने मला देऊन जाताचं! आजोबा…. मी, बाबा, आज्जी आणि खास करून राहूलचाचू आम्ही सगळे तुमची आठवण काढतो! तुमच्या आठवणीत राहतो! जर-तर च्या गोष्टी होतात, आणि प्रत्येकाचे त्या दृष्टीने स्वत:चे सिनेमे सुरु होतात. आमचे आमचे स्वतंत्र सिनेमे असले तरी त्या सिनेमात ‘नायक’ हा ‘राजशेखरचं’ असतो! असो…. बाकी HAPPY BIRTHDAY ‘बर्थडे पार्टनर’…लव यु ”