फोटो सौजन्य: सोशल मीडिया
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाबद्दल अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं खूप कौतुक केलं आहे. दिग्दर्शकांनी उत्तम चित्रपट महाराजांवर आणला आहे, असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं. त्यांनी लोकांना हा चित्रपट पाहण्याची हात जोडून विनंती केली आहे. ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षे काय म्हणाले, जाणून घेऊयात.
अजय- काजोलच्या लेकीला पाहून तब्बू का रडायला लागली ? स्वत: तिनेच सांगितला किस्सा
व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, “नमस्कार! मी आत्ताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. त्यांनी चित्रपट खूपच उत्तम बनवला आहे. प्रत्येक हिंदुस्थानीयांनी, प्रत्येक भारतीयाने आणि प्रत्येक हिंदूंनी हा चित्रपट पाहायला हवा. रक्त खवळतं पण डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट सोसले आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सीमा पार केल्या. लक्ष्मण उतेकर साहेबांनी या सिनेमाला खूप सुंदर पद्धतीने चित्रित केलं आहे. मानलं पाहिजे, तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. चित्रपटात जितके पण मराठी आहेत त्या सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अनेक वर्षांनी एक उत्कृष्ट ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळाला.”
दुखापतीतून बरा होऊन विजय देवरकोंडा पोहचला ‘किंगडम’च्या शुटिंगला, चित्रपटाची नवीन अपडेट आली समोर
व्हिडिओच्या पुढच्या भागात अभिनेता शरद पोंक्षे म्हणतात, “या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एआर रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक खूप छान आहे. औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही. कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण. हा चित्रपट पाहावा लागेल, महानायकांकडून शिकावं लागेल. प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदूने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो ‘छावा’ नावाचा चित्रपट आहे तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि ‘छावा’चित्रपट पाहा,” असं आवाहन शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये आपल्या चाहत्यांना केलं आहे.