(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी संत साहित्याचा अमूल्य ठेवा आणि संस्कृती, परंपरा व आत्मसन्मानाचे प्रतीक असलेला ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि रसिकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. हा टिझर एवढा आवडला की, चाहत्यांनी त्याला चक्क संस्कृत भाषेत करून पाठवले. ही प्रतिक्रिया केवळ कलाकारांचा गौरव नाही तर एका कलाकृतीस मिळालेली रसिकांची उत्कृष्ट दाद आहे.
कलांचा आस्वाद घेणारे रसिक एखाद्या कलाकृतीला पूर्णत्व देतात. सगळे कलाकार होऊ शकत नाहीत, पण रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. प्रत्येक कलाकारासाठी रसिकांचे प्रेम आणि कौतुक अत्यंत महत्त्वाचे असते.
पॅनोरमा स्टुडिओज या नामांकित निर्मिती संस्थेतर्फे ‘अभंग तुकाराम’ सादर केला जात आहे. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
टिझरचा संस्कृत अनुवाद डॉ. श्रीहरी व्ही. गोकर्णकर यांनी केला तर डबिंगची जबाबदारी श्रीमती मनीषा पंडित आणि डॉ. गोकर्णकर यांनी सांभाळली. व्हिडिओ संकलन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग वेदांत नितीन जोग यांनी केले, तर ऑपरेशनल सपोर्ट प्रांजल अक्कलकोटकर यांनी दिला.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात, “आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावना खूप आनंद देणारी आहे. रसिकांच्या या उत्स्फूर्त दादेमुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. ‘अभंग तुकाराम’ माझ्यासाठी खूप खास आहे; चित्रपट तर आयुष्यभर सोबत राहणार आहे, पण रसिकांची ही दाद कायम राहील.”






