फोटो सौजन्य - Social Media
श्रद्धा ही केवळ एक भावना नसून, ती माणसाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी, त्याला अडचणींमधून मार्ग दाखवणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर, अढळ विश्वासावर आणि भक्तीच्या अखंड प्रवासावर आधारित ‘पालखी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील भक्तांची निस्वार्थ सेवा, त्यांची श्रद्धा आणि भक्तीची चालती-बोलती अनुभूती या चित्रपटातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.
केएसआर फिल्म्स निर्मित ‘पालखी’ या चित्रपटाचा मुहूर्त आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते, असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मुहूर्त सोहळ्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निखिल चंद्रकांत पाटील लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश राज आंगणे करत असून, प्रभू कापसे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘पालखी’ या चित्रपटासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार एकत्र आले आहेत. सिद्धार्थ बोडके, यतिन कार्येकर, प्रवीण तरडे, सुबोध भावे, किशोर कदम, गौरी नलावडे, वीणा जामकर, संदीप गायकवाड, शंतनू रांगणेकर, ओंकार कदम आणि अथर्व रुके हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अनुभवी आणि तरुण कलाकारांचा हा संगम चित्रपटाला अधिक सशक्त बनवणार आहे.
मुहूर्तप्रसंगी बोलताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, “साईबाबांची लीला अगाध आहे. मी स्वतः साईभक्त आहे. साईबाबांच्या पालखीवरील हा चित्रपट लाखो भक्तांना प्रेरणा देईल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल,” असे सांगत त्यांनी संपूर्ण चित्रपट टीमला शुभेच्छा दिल्या.
दिग्दर्शक श्रेयश राज आंगणे यांनी चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल सांगताना म्हटले, “पालखी म्हणजे श्रद्धेची चालती-बोलती अनुभूती आहे. पालखीसोबत चालताना मन निर्मळ होते, अहंकार गळून पडतो आणि भक्तीची अपार ऊर्जा अनुभवायला मिळते. हीच ऊर्जा आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.” ‘पालखी’ हा चित्रपट एका सामान्य युवकाच्या जीवनातील संघर्ष, प्रश्न, वेदना आणि अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे नेणारा प्रवास उलगडतो. साईबाबांवरील श्रद्धा त्याच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवते, हे कथानकातून प्रभावीपणे दाखवले जाणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद निखिल चंद्रकांत पाटील आणि श्रेयश राज आंगणे यांनी लिहिले आहेत.
चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत, संकलन प्रशांत खेडेकर, कलादिग्दर्शन नितेश नांदगावकर, संगीत श्रेयश राज आंगणे, रंगभूषा राजेश वाळवे आणि वेशभूषा सिद्धी योगेश गोहिल यांची आहे. साहसदृश्यांची जबाबदारी रवी दिवाण यांनी सांभाळली आहे. एकूणच, ‘पालखी’ हा चित्रपट साईबाबांच्या भक्तीवर आधारित केवळ एक कथा न राहता, श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचा अनुभव देणारी भावपूर्ण कलाकृती ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






