निवेदिता सराफ यांची होणार मालिकेत एंट्री
अनेक मराठी चित्रपटांमधून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादुई नातं आणि अभिनय प्रेक्षकांनी अनुभवलाय. त्यांची कमाल केमिस्ट्री, पडद्यामागील भक्कम आणि आदराचं असणारं नातं आणि भावनिक ओलावा हे त्यांच्या प्रेमामुळे नेहमीच ऑन आणि ऑफस्क्रिन दिसून येतं. चित्रपटांमधून निवेदिता सराफ आणि अशोक सराफ हे बरेच वेळा एकत्र दिसले आहेत. पण बरीच वर्ष दोघांनी कधीही मालिकेत काम केलेले नाही आणि आता हा सुवर्णयोग जुळून येतोय तो म्हणजे कलर्स मराठीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेमुळे. या मालिकेत निवेदिता सराफ यांची आता खास भूमिका असणार आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवेदिता सराफ यांच्यासह ‘नवराष्ट्र’ने खास बातचीत केली आणि त्यांनीही आपला उत्साह अगदी भरभरून दाखवत मनसोक्त उत्तरं दिली आहेत. अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत. निवेदिता सराफ याबाबत काय म्हणाल्या जाणून घेऊया
इतक्या वर्षानंतर दोघं जण पुन्हा एकत्र काम करणार कसं वाटतंय?
अत्यंत उत्साहाने निवेदिता सराफ म्हणाल्या की, “मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची. पण इतक्या मोठ्या कलाकारासह काम करताना थोडंसं दडपण येतंच. कारण त्यांचं संवादफेक करण्याचं टायमिंग आणि त्यांचा अनुभव हे फारच ग्रेट आहे आणि बायको असले तरीही त्यांच्याबरोबर बऱ्याच वर्षांनी काम करताना थोडंसं टेन्शन नक्कीच आलं आहे’’, असं अगदी हसत हसत त्यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या की, ‘टेन्शन जरी असलं ना तर काम करताना समोरच्याला कसं पटकन सेटल करायचं हे अशोकजींना चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळे एकदा कामाला सुरू केल्यानंतर काही अडचण आली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही केमिस्ट्री आवडेल अशी अपेक्षा आहे.’
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून हाक का मारतात? जाणून घ्या
मालिकेत कोणती भूमिका साकारणार?
‘अशोक मा. मा. या मालिकेत निवेदिता हीच भूमिका साकारणार आहे आणि स्वतःचा ‘ संस्कार वर्ग’ चालवणारी उत्साही अशी अविवाहित महिला ती असेल. मुलांना कंटाळवाण्या स्वरूपात संस्कार न देता त्यांना कळेल असं आणि त्यांच्या कलाने हास्याच्या आणि कथा-कलेच्या माध्यमातून शिकवणारी ही शिक्षिका असणार आहे. खरं तर ‘आयुष्याचे धडे देणारी शिक्षिका’ अशी ही भूमिका आहे. पण असं म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींबाबत प्रकर्षाने शिक्षण देणारी अशी भूमिका साकारत आहे’, असं निवेदिता ताई म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितले की, ‘मुलांना अजिबात लेक्चर्स स्वरूपात शिकणं आवडत नाही. त्यांना हसतखेळत आयुष्याचे अनुभव आणि गोष्टी शिकवल्या की पटकन कळतात. सध्या जे काही नकारात्मक मालिकेत चालू आहे ते सकारात्मक करण्यासाठी माझी भूमिका नक्की मदत करेल. एक शिक्षिका म्हणून वेगळी पद्धत वापरून मुलांना योग्य मार्गदर्शन करणारी ही भूमिका आहे’
नैसर्गिक केमिस्ट्री अधिक दिसेल का?
यावर निवेदिता सराफ मनापासून म्हणाल्या की, ‘नवऱ्यासह काम करणं सोपं आहे. कारण इतक्या वर्षांचा सहवास आणि केमिस्ट्री असते आणि ती सहजपणाने कॅमेऱ्यासमोरही दिसून येणारच. त्याशिवाय अशोकजी नेहमीच समोरच्या व्यक्तीला काम करताना इतका आरामदायी अनुभव देतात की, काम करणं अधिक सोपं होतं. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कलाकाराला ते सहजपणा आणून देतात आणि बऱ्याच वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे त्यामुळे जितका उत्साह काम करण्याचा आहे तितकीच एक वेगळी जबाबदारीही आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल’
भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
यामध्ये अशोक मामांसह तुमची जोडी असणार का?
‘यासाठी तुम्हाला मालिकाच बघावी लागेल आणि पुढे हे कथानक कशा पद्धतीने वळण घेईल हे मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी प्रेक्षकांना मालिका बघूनच मजा येईल. तसंच आम्हा दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास आहे’






