फोटो सौजन्य: विकी कौशल इन्स्टाग्राम
सध्या जाऊ तिथे विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने एका आठवड्यातच २०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशातही जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाने देशात २१९. २५ कोटींची तर, जगभरात ३०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये एक लहान मुलगा गारद देताना दिसत होता. त्यानंतर आता एक महिला अभिनेत्याची नजर काढताना दिसून येत आहे. विकीची नजर काढतानाचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…
काही तासांपूर्वीच विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्याच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने त्याची दृष्ट काढलीये. हा व्हिडिओ विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या ह्या व्हिडिओमध्ये, विकी त्याच्या घरामध्ये उभा आहे. त्यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या मदतनीस आशा ताई त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. अभिनेत्याला ‘छावा’ चित्रपटासाठी सध्या मिळत असलेल्या यशासाठी त्या त्याची दृष्ट काढताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अभिनेत्याच्या घरी काम करीत आहेत.
अभिनेत्याने मोलकरीण आशा ताईंचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिलंय की, “आशा ताईंनी मला उंचीने आणि आयुष्यात मोठं होताना पाहिलेलं आहे. कालच त्यांनी माझा ‘छावा’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘उभे राहा, नजर काढायची आहे तुमची…’ ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्या नेहमीच माझी काळजी करत असतात. माझ्या आयुष्यात त्या आहेत याचा मला खरंच खूप आनंद आहे.” विकीच्या व्हिडीओवर ‘छावा’मध्ये कान्होजीची भूमिका साकारणाऱ्या सुव्रत जोशीने “इडा पीडा टळो, हे किती गोड आहे” अशी कमेंट केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.