फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि BCCI चे माजी अध्यक्ष म्हणून सर्व सामान्यांमध्ये सौरव गांगुलीची ओळख आहे. क्रिकेटर सौरव गांगुलीचे नाव टीम इंडियाच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये घेतले जाते. अशा या लोकप्रिय खेळाडूचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बायोपिक येत आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यानंतर BCCI चे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येतोय. याबद्दलची माहिती स्वत: सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांना दिली आहे.
आपल्या चाहत्यांमध्ये क्रिकेटचा ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार ? याची माहिती क्रिकेटरने स्वत: दिली आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. राजकुमार माजी क्रिकेटर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये माध्यमांशी बोलताना सौरभ गांगुलीने सांगितले की, “मी जे ऐकले आहे त्यानुसार, राजकुमार राव मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु सध्या तारखेचा घोळ असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी बरेच दिवस लागण्याची शक्यता आहे.”
क्रिकेटर सौरव गांगुलीचं भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले होते. बायोपिकमध्ये क्रिकेटरचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याचं मैदानातील नेतृत्व याबाबत चित्रण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळणारा सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष ते कर्णधार म्हणून त्याचं एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे. त्याने आपल्या करियरमध्ये अनेक क्रिकेट सामने भारताला जिंकवून दिले आहेत. क्रिकेट जगतात ‘दादा’म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या भूमिकेत बॉलिवूडमधील चतुरस्र आणि प्रयोगशील अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला राजकुमार राव दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने अनेक चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य चाहत्यांना दाखवून दिलेले आहे. त्यामुळे तो सौरव गांगुली कसा साकारतो, याबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली असेल. सौरभ गांगुलीच्या बायोपिकच्या आधी राजकुमार रावचा ‘भूल चुक माफ’ या आगामी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री वामिका गब्बीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय राजकुमारकडे ‘मलिक’ नावाचाही चित्रपट आहे, ज्यामध्ये तो अॅक्शन करताना दिसणार आहे. तो चित्रपट यावर्षीच रिलीज होण्याची शक्यता आहे. तर ‘टोस्टर’मध्ये राजकुमार कंजूस पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.